अवैध बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदला आणखी एक झटका बसला आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईविरोधात सोनू सूदने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र, महापालिकेने केलेली कारवाई योग्य असल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं सोनू सूदची याचिका फेटाळून लावली.

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदला अवैध बांधकामप्रकरणी नोटीस बजावली होती. मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. झालेल्या सुनावणीमध्ये महानगरपालिकेने केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे.


सोनू सूदने शक्तीसागर या सहा मजली इमारतीत अवैध बांधकाम केल्याचं म्हणत मुंबई महानगरपालिकेने त्याला नोटीस बजावली होती. सोनू सूदने जुहू येथील रहिवासी इमारतीत महापालिकेला कुठलीही माहिती न देता त्याने संरचनात्मक बदल केले असल्याचा आरोप या नोटीसीत करण्यात आला होता. महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोनूने अॅड. डी. पी. सिंह यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज त्यावर सुनावणी करण्यात आली.

वाचा : ‘त्या पार्टीत आमची भेट झाली अन्…’; अशी सुरू झाली रिया-सुशांतची लव्हस्टोरी

मुंबई महापालिकेने यासंदर्भात जुहू पोलिसांमध्ये ४ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं की, सोनूने शक्तीसागर या रहिवासी इमारतीचं विनापरवानगी हॉटेलमध्ये रुपांतरीत केलं आहे. लॉकडाउनच्या काळात सोनू सूदने याच इमारतीत स्थलांतरितांसाठी राहण्याची व्यवस्था केली होती.