मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सूदवर अवैध बांधकामप्रकरणी नोटीस बजावली आहे. याविरोधात सोनूने मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून बुधवारी कोर्टात सुनावणी झाली. दरम्यान, या प्रकरणावर आपला निर्णय राखून ठेवला. यापूर्वी ११ जानेवारी रोजी कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली होती.

सोनू सूदने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांची बुधवारी भेट घेतली. ही भेटही मुंबई महापालिकेच्या नोटीसीच्या पार्श्वभूमीवर असल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे महापालिकेच्या नोटीसीमुळे वैतागलेल्या सोनूने सोशल मीडियावर आपलं मन मोकळं केलं. सोनूने ट्विटरवर म्हटलं, “मसला यह भी है दुनिका का…की कोई अच्छा है, तो अच्छा क्यों है”

मुंबई महापालिकेने मंगळवारी मुंबई हायकोर्टात दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा सवयीचा गुन्हेगार आहे. सोनू सूदविरोधात अवैध बांधकामाच्या आरोपांखाली महापालिकेनं नोटीस पाठवली असून जुहू येथील रहिवासी इमारतीत महापालिकेला कुठलीही माहिती न देता त्याने संरचनात्मक बदल केले असल्याचा आरोप या नोटीसीत करण्यात आला आहे. या नोटीसीविरोधात सोनू सूदने हायकोर्टात धाव घेतली आहे.

सोनूने अॅड. डी. पी. सिंह यांच्यामार्फत गेल्या आठवड्यात मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी म्हटलं की, सोनूने सहा मजली शक्तीसागर इमारतीत कोणतंही अवैध बांधकाम केलेलं नाही. तसेच याचिकेत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महापालिकेद्वारे पाठवलेली नोटीस रद्द करणे आणि याप्रकरणी कोणत्याही दंडात्मक कारवाईपासून अंतरिम दिलासा देण्याची विनंती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने यासंदर्भात जुहू पोलिसांमध्ये चार जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं की, सोनूने शक्तीसागर या रहिवासी इमारतीचं विनापरवानगी हॉटेलमध्ये रुपांतरीत केलं आहे.