नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले आणि सध्या नागपूर कारागृहात असलेले प्रा. जी. एन. साईबाबा यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने तीन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. वैद्यकीय उपचार घेण्यासाठी न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
पक्षाघाताच्या झटक्यानंतर साईबाबा यांना ९० टक्के अपंगत्त्व आले असून, ते अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल सामाजिक कार्यकर्त्यां पूर्णिमा उपाध्याय यांनी न्यायालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पत्राची मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत त्याचे याचिकेमध्ये रुपांतर केले होते. त्यावर गेले काही दिवस सुनावणी सुरू होती. न्यायालयाने त्यांचा वैद्यकीय अहवाल मागवून घेतला होता. तो मिळाल्यानंतर उपचार घेण्यासाठी तीन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. या काळात ते कुठे उपचार घेणार आहेत, याची माहिती पोलीसांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.