गेल्या काही दिवसांमध्ये करोना रुग्णालयांत आणि इतर ठिकाणी देखील रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढल्यातं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं आहे. “आपल्याला डॉक्टरांना आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना सुरक्षित करावंच लागेल. विशेषत: जेव्हा ते अत्यंत तणावाच्या परिस्थितीत आपल्यासाठी अथकपणे काम करत आहेत”, असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं. न्यायमूर्ती दिपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर डॉ. राजीव जोशी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी सुरू होती. त्यावेळी न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं.

‘ते समाजाला वाचवत आहेत!’

डॉक्टरांवरच्या हल्ल्यांबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. “ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जर आपण डॉक्टरांना सुरक्षा पुरवू शकलो नाहीत, तर एक जबाबदार राज्य म्हणून तो आपला पराभव ठरेल. ते समाजाला वाचवत आहेत”, असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं. तसेच, “प्रशासनाकडून निर्माण झालेल्या ऑक्सिजन किंवा औषधांच्या तुटवड्यासाठी डॉक्टरांना बळीचा बकरा बनवला जाऊ शकत नाही”, असं देखील न्यायालयानं नमूद केलं.

२०१६च्या खात्रीची करून दिली आठवण!

दरम्यान, यावेळी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला २०१६ साली राज्य सरकारने न्यायालयाला दिलेल्या खात्रीची आठवण करून दिली. डॉक्टरांना पोलीस सुरक्षा पुरवण्यासंदर्भात सरकारने दिलेल्या शब्दाचं काय झालं? अशी विचारणा न्यायालयाने केली.

“आम्हाला कामचोर, बावळट म्हटलं जातं”; CMO वर आरोप करत UP मधील डॉक्टरांचा सामूहिक राजीनामा

रुग्णालयातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट

यावेळी न्यायालयाने लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती प्रबोधन उपक्रमाने दाखव केलेल्या जनहित याचिकेवर देखील सुनावणी घेतली. रुग्णालयातून निघणाऱ्या मास्क, पीपीई किट आणि इतर कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यावर, “सर्व जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना कोविड रुग्णालयांमधून बाहेर पडणाऱ्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जावी असे निर्देश द्यावेत”, असं देखील न्यायालयाने सरकारला सांगितलं.

यवतमाळात खासगी कोविड रुग्णालयात तोडफोड

गडचिरोलीत डॉक्टरला मारहाण

नुकतीच गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लारेन्स गेडाम याने आरमोरी शासकीय कोविड केंद्र येथे कर्तव्यावर असलेले डॉ. अभिजित मारबते यांना मारहाण केल्याने आरोग्य खात्यात खळबळ उडाली. लारेन्स गेडाम याने कोविड सेंटरवर जाऊन येथे मागील दोन महिन्यापासून कोविड केंद्रातच मुक्काम करून रुग्णांना सेवा देणारे युवा डॉ. अभिजित मारबते यांच्या सोबत कारण नसताना मारहाण केल्याचा दावा रुग्णालयातील त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.