मंजुळा शेटय़ेच्या हत्येची उच्च न्यायालयाकडून दखल

भायखळा कारागृहात वॉर्डन मंजुळा शेटय़े हिचा छळ करून केलेल्या हत्येची उच्च न्यायालयाने शुक्रवारी गंभीर दखल घेतली. या प्रकरणामुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून त्याकडे लक्ष देण्याची गरज न्यायालयाने बोलून दाखवली.

पुणे येथील येरवडा कारागृहातील दयनीय स्थितीबाबत शिवाजी चौधरी या कैद्याने केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने शेटय़े हिच्या हत्या प्रकरणाची दखल घेतली. कारागृहांतील दयनीय स्थितीबाबत अन्य खंडपीठासमोर जनहित याचिका दाखल आहे आणि त्या प्रकरणात कारागृहांची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने तपशीलवार आदेशही देण्यात आलेले आहेत.

त्यामुळे ही याचिका अद्यापही प्रलंबित आहे की निकाली काढण्यात आली आहे, या याचिकेमध्ये कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा नमूद करण्यात आला होता की नाही, याबाबत माहिती घेऊन पुढील सुनावणीच्या वेळी सांगण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारी वकिलांना दिले. या याचिकेमध्ये कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा समाविष्ट नसेल तर चौधरी याने केलेल्या याचिकेवर आम्ही सुनावणी घेऊ, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

भायखळा कारागृहात शेटय़े हिची ज्या पद्धतीने हत्या झाली त्यानंतर कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. त्यामुळे तो गांभीर्याने घेऊन त्याच्या दृष्टीने विचार करण्याची आणि आदेश देण्याचेही न्यायालयाने म्हटले.

पाव आणि अंडय़ांचा हिशेब न लागल्याने कारागृह अधीक्षक आणि अन्य महिला अधिकाऱ्यांनी शेटय़े हिला बेदम मारहाण करून, तिचा लैंगिक छळ केल्याचा आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर अन्य महिला कैद्यांनी कारागृहाच्या गच्चीवर जात निषेध केला होता. शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिनेही या घटनेनंतर तिलाही मारहाण करण्यात आल्याचा आणि मंजुळाप्रमाणेच तिचाही लैंगिक छळ करण्याचे धमकावल्याचा आरोप न्यायालयासमोर केला होता. न्यायालयाने त्याची दखल घेत तिला गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते.