अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबाबत मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात बऱ्याच त्रुटी असल्याने त्यांच्याकडून तपासाची सूत्रे काढून घेऊन तो मुंबई उच्च न्यायालयाने  गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग केला.
जियाची आत्महत्या नाही तर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करीत तिची आई राबिया हिने उच्च न्यायालयात धाव घेत तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा व जियाचा मित्र सूरज याच्यावरही राबिया यांनी संशय व्यक्त करून पोलीस त्याला वाचविण्यासाठी जियाची हत्या ही आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही तिने केला होता.
न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर राबियाच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले की या प्रकरणी न्यायवैद्यक मत घेण्याची जबाबदारी खरेतर पोलिसांची होती. परंतु राबिया यांनी ते काम केले. यातूनच तपासात बऱ्याच त्रुटी असल्याचे दिसून येत असल्याचे न्यायालयाने म्हटले.
सीबीआयने एफबीआयकडून काही धडे घ्यावे!
या प्रकरणाची सूत्रे घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या सीबीआयला न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. आपल्याकडे मनुष्यबळ नाही, कामाचा प्रचंड ताण आहे अशा सबबी सीबीआयसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने देणे आश्चर्यकारक असल्याचे न्यायालयाने म्हटले. जिया अमेरिकी नागरिक असल्याने अमेरिकी दुतावासातील दोन अधिकारी येथील सुनावणीसाठी जातीने हजर राहतात. यातूनच अमेरिका त्यांच्या नागरिकांबाबत किती संवेदनशील आहे हे दिसून येते. दुसरीकडे सीबीआय तपास करण्यासाठीच नाही म्हणते. त्यांनी एफबीआयकडून शिकण्याची गरज आहे, असे न्यायालयाने सुनावले.