News Flash

मुंबई आणि नवी मुंबई खाडीलगत ‘रशियन पाहुणा’

मुंबईतील खाडीलगतच्या दलदलीच्या भागात पक्ष्यांना लागणारे अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

 

रशियाचा बाकचोच तुतारी पक्षी;  ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने राबवलेल्या रिगिंग प्रकल्पाला यश

रशियामधून स्थलांतर करून भारतात येणाऱ्या बाकचोच तुतारी या पक्षाला मुंबई व नवी मुंबई खाडीलगतचा परिसर खुणावत असल्याचे ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने राबवलेल्या रिगिंग प्रकल्पांतर्गत आढळून आले आहे.

मुंबईतील खाडीलगतच्या दलदलीच्या भागात पक्ष्यांना लागणारे अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तिथले किडे, जीवजंतू, मासे यांसारखे हे घटक स्थानिकांबरोबरच स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करतात. उन्हाळ्यातील प्रजननाचा काळ संपल्यानंतर रशियातील बाकचोच तुतारी पक्षी हिवाळ्यात भारतामध्ये स्थलांतर करतात.

बीएनएचएसने रिगिंग प्रकल्पांतर्गत डिसेंबर, २०१४ आणि फेब्रुवारी, २०१५ दरम्यान १,५०० पक्ष्यांचे रिगिंग आणि टॅगिंग केले होते. यात ४०० बाकचोच तुतारी पक्ष्यांचाही समावेश होता. त्यामुळे या पक्ष्यांचा प्रवास मार्ग आणि सातत्याने भेटी देण्याचे ठिकाण त्यांना अभ्यासता आले.

यातले काही बाकचोच तुतारी पक्षी बीएनएचएसचे पक्षितज्ज्ञ डॉ. राजू कासंबे यांना शिवडी खाडीजवळ तर पक्षिनिरीक्षक एन कृष्णन व अश्विनी मोहन यांना नवी मुंबई खाडीजवळ दिसले. दीर्घ प्रवासानंतर पक्ष्यांना मुबलक अन्न लागते. कारण धष्टपुष्ट होऊन त्यांना परतीचा प्रवास करायचा असतो.

त्याच्यासाठी खाडीजवळील परिसर अनुकूल ठरतो, असे बीएनएचएसच्या पक्षितज्ज्ञ तुहीना कुट्टी यांनी सांगितले.

गेल्या वर्षी हे पक्षी आम्हाला दिसले नव्हते. मात्र दीर्घ प्रवास करून यंदा ते येथे आले आहेत, असे कासंबे यांनी सांगितले.

हे पक्षी स्थलांतरादरम्यान सातत्याने मुंबईच्या खाडी परिसरात दिसतात. पक्षीनिरीक्षकांनी हे पक्षी दिसल्यास आम्हाला त्याची माहिती द्यावी. जेणेकरून त्या पक्ष्यांचा प्रवास, त्यांचे स्थलांतरादरम्यान वास्तव्याचे ठिकाण याबद्दलची माहिती संग्रहित करता येईल, असे आवाहन बीएनएचएसचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी केले आहे.

पक्ष्यांचे रिगिंग म्हणजे काय?

रिगिंगमध्ये वजनाने हलकी असलेली धातूची एक गोलाकार कडी पक्ष्याच्या पायात घातली जाते. या गोलाकार कडीवर एक  क्रमांक लिहिलेला असतो. यावरून हा पक्षी इतरत्र दिसल्यास त्याची ओळख पटते. थोडक्यात पक्षी जर वेगवेगळ्या प्रदेशांत स्थलांतर करीत असेल तर त्याच्या प्रवास मार्गाची नोंद करणे सोपे जाते. १९२७ पासून बीएनएचएस रिंगिंग प्रकल्प राबवीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 4:45 am

Web Title: bombay natural history society rigging project mumbai navi mumbai creek
Next Stories
1 ‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प स्पर्धा’
2 करिअरची गुंतागुंत सोडवणारा ‘मार्ग यशाचा’
3 चंद्रपूर, कोराडी, परळी विद्युत प्रकल्पांच्या वाढीव खर्चास मान्यता
Just Now!
X