‘बॉम्बे रनिंग’ला स्पर्धकांचा भरभरून प्रतिसाद; मानसिक-शारीरिक तंदुरुस्तीवर भर

मानसी जोशी, लोकसत्ता

मुंबई : दहा दिवसांपूर्वी मुंबईत ‘बॉम्बे रनिंग’ ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ठराविक अंतर पार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. स्पर्धकांनी ते पारही केले आणि ते पूर्ण केल्याची वेळही नोंदवली. पण यातील सारे सोपस्कार ‘आभासी पद्धती’नुसार पार पडले. म्हणजे दहा किलोमीटर धावण्याचे आव्हान प्रत्येक स्पर्धकाने स्वीकारले आणि मुंबईतील चेंबूर, शिवाजी पार्क, मरीन ड्राइव्ह, वरळी, वांद्रे आणि जुहू या भागांत ही धाव पूर्ण केली आणि बक्षीसही मिळवली.

करोनाकाळात मर्यादांमुळे मॅरेथॉन तसेच इतर स्पर्धा आयोजित करण्यास बंधने आहेत. त्यात संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने एकत्र येण्यावर मर्यादा असल्याने एकाच ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणे शक्य नाही. त्यामुळे आयोजकांनी ‘व्हच्र्युअल मॅरेथॉन’ आयोजित केली. ‘बॉम्बे रनिंग’मधील सहभागी धावपटूंसाठी रोज पाच वा दहा किलोमीटर धावण्याचे लक्ष्य होते. ही स्पर्धा दहा दिवसांसाठी होती. अर्थात या कालावधीत प्रत्येक स्पर्धकाला ५० वा १०० किलोमीटर अंतर त्यांच्याच परिसरात धावून पूर्ण करायचे होते.

या स्पर्धेत विविध गटात सहभागी होत स्पर्धकांनी ‘अ‍ॅप’द्वारे लक्ष्य पूर्ण केल्याची वेळ आयोजकांकडे नोंदवली. काहींनी बक्षिसेही पटकावली. करोनाकाळात लादलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या. आता अशा स्पर्धाचे माध्यमातून स्पर्धकांचे मनोबल उंचावण्यास मदत झाल्याचे  मत ‘बॉम्बे रनिंग’ या समूहाचे प्रमुख दीपक ओबेरॉय यांनी व्यक्त के ले.

दोन महिन्यांपूर्वी युनायटेड स्पोर्टसच्या वतीने आभासी पद्धतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मॅरेथॉनला धावपटूंचा उत्तम प्रतिसाद लाभला. यात काही स्पर्धक घर, गच्ची तसेच मैदानात धावले.

या वेळी सिद्धार्थ गुप्ता म्हणाले, की  एकत्र येता येत नसेल तर अशा क्रीडा उपक्रमांमुळे स्पर्धकांचा व्यायाम होतो आणि त्यांच्यात सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे अशा स्पर्धातील सहभागही वाढला आहे.

रवी उईके या हौशी सायकलपटूने भारतीय वायुदलाच्या क्रीडा उपक्रमात भाग घेतला आहे. यात स्पर्धकांना १० किलोमीटर याप्रमाणे, ३० दिवसांत ३०० किमी अंतर सायकलने पार करायचे आहे. माझे २० दिवसांत २०० किलोमीटर पूर्ण आहेत.  १०० किलोमीटर अंतर शिल्लक आहेत.

लंडन मॅरेथॉनमध्ये ठाण्यातील स्पर्धक

ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवडय़ात जगातील महत्त्वाची मानली जाणारी लंडन मॅरेथॉन पार पडली.  ठाण्यातील डॉ. महेश बेडेकरसह सहा हौशी धावपटू या मॅरेथॉनमध्ये व्हच्र्युअल पद्धतीने सहभागी झाले होते. यात बेडेकरांनी ४२.२ किलोमीटर अंतर ३ तास ३३ मिनिटात पार केले. दरवर्षी एक तरी मॅरेथॉन धावणाऱ्या बेडेकरांनी यंदा करोनामुळे ठाण्यातच धावण्याचा निर्णय घेतला. या अनुभवाबद्दल त्यांनी सांगतिले की,‘व्हच्र्युअल मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा अनुभव वेगळा होता. ठाण्यातील बराचसा भाग उंचसखल असल्याने तेथे धावणे हे एक प्रकारचे आव्हान होते. आदल्या दिवशी पाऊस पडून गेल्याने वातावरण धावण्यास अनुकूल होते. लंडन येथील प्रमाणवेळेनुसार पहाटे ४.३० वाजता ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथून सुरूवात केली.