मुंबई : परळ येथील बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात ‘ग्रिसेली सिन्ड्रोम’आजार असलेल्या ५ वर्षीय मुलावर यशस्वीपणे बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.

नांदेडच्या अयानला वारंवार ताप, यकृताला मोठी सूज आणि शरीरातील पेशी कमी झाल्याची तक्रार होती. दोन वर्षांचा असताना अयानला वाडिया रुग्णालयात आणले होते. तपासण्यांत त्याच्या शरीरातील प्रतिकारशक्ती नेहमीच कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. काही तपासण्यांवरून त्याला ग्रिसेली सिन्ड्रोम असल्याचे समजले.

बाहेरील विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याला मारण्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती कार्यरत होते आणि एकदा हे विषाणू मेले की पुन्हा नियंत्रणात येते. अयानमध्ये मात्र प्रतिकारशक्ती अनियंत्रित स्वरूपात कार्यरत होती. परिणामी या शक्तीने त्याच्या यकृतावर आणि बोन मॅरोवर हल्ला चढविणे सुरू केले होते. त्याचे यकृत आणि बोन मॅरो बाधित होऊ लागले. त्यावेळी त्याच्या पालकांना बोन मॅरो प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. वाडियामध्ये तेव्हा बोन मॅरो प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध नव्हती. त्याच्या पालकांनी ही शस्त्रक्रिया न करता पुढे उपचार सुरू ठेवले. त्याच्या अनियंत्रित प्रतिकारक्षमतेवर नियंत्रण न आल्याने पुढे त्याच्या मेंदूवरही परिणाम होऊ लागल्याने चार  वर्षांचा असताना पुन्हा त्याला वाडियामध्ये आणले. यावेळी त्याला वाडियाच्या बोन मॅरो प्रत्यारोपण केंद्रात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आणि त्यांचे पालक कालांतराने यासाठी तयार देखील झाले.

अयानच्या दोन्ही भावंडांच्या ऊती अयानपेक्षा वेगळ्या होत्या. त्यामुळे बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी दात्याचा शोध घेतला गेला. नोंदणीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या एका मुलीचा बोन मॅरो अयानशी जुळल्याने ही शस्त्रक्रिया पार पडली. अयानमधील पांढऱ्या पेशी या सदोष असल्याने हा आजार नियंत्रणात येत नव्हता. बोन मॅरो प्रत्यारोपित केल्याच्या त्याच्या शरीरात नव्या पांढऱ्या पेशी तयार होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सध्या त्याचा आजार पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे माहिती वाडिया रुग्णालयाच्या बोन मॅरो प्रत्यारोपण विभागाचे फिजिशयन डॉ. प्रशांत हिवरकर यांनी सांगितले.

रुग्णाची आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी रुग्णालयात गुंतागुतीची शस्त्रक्रिया उपलब्ध केली जाते, हे सर्वसामान्यांनी लक्षात घ्यावे. राज्यभरात ५०० रुग्णांना बोन मॅरो प्रत्यारोपणाची आवश्यकता असून गरजूंनी याचा फायदा अधिकतर घ्यावा, असे आवाहन वाडिया रुग्णालयाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी केले.