मुंबई : निवृत्त मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावे स्थापन करण्यात आलेल्या फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये चांगले काम करणारे सरकारी अधिकारी आणि वैयक्तिक पातळीवर देण्यात येणाऱ्या पहिल्या पुरस्कारासाठी सनदी अधिकारी अभिजित बांगर, भारतीय पोलीस सेवेतील डॉ. अभिवन देशमुख, आदिवासी मुलांची शाळामधील उपस्थिती आणि गुणवत्ता वाढावी म्हणून काम करणाऱ्या अश्विनी सोनावणे, कांदळवनांच्या जतनासाठी काम करणारे एन. वासुदेवन, निसर्ग पर्यटन क्षेत्रातील जितेंद्र रामगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

बोंगीरवार यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १८ मे रोजी या पुरस्कारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता होणार

आहे. अरुण बोंगीरवार यांचे १४ डिसेंबरला निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ बोंगीरवार कुटुंबीय आणि मित्र परिवाराने ‘अरुण बोंगीरवार फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फाऊंडेशनच्या वतीने राज्य सरकारच्या ‘यशदा’ या संस्थेच्या सहकार्याने दर वर्षी दोन सनदी अधिकारी आणि वैयक्तिक पातळीवर काम करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार विजेत्या दोन्ही अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या पुरस्कारासाठी यशदा संस्थेने अर्ज मागविले होते. या अर्जाची यशदा संस्थेच्या वतीने छाननी करण्यात आली. तज्ज्ञांचा समावेश असलेल्या निवड समितीने अंतिम विजेत्यांची निवड केली आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी या गटात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पालघर आणि अमरावतीमध्ये जिल्हाधिकारीपदी असताना आदिवासी शेतकऱ्यांना सौरऊर्जा तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले होते. यामुळे कापणीसाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग झाला होता. जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा योग्य पद्धतीने वापर केला होता.

विशेष पुरस्कार या गटात गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक व कोल्हापूरचे विद्यमान अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गडचिरोलीत पोलीस अधीक्षक असताना आदिवासी, स्थानिक आणि पोलीस यांच्यात योग्य समन्वय साधण्याचे काम केले होते. शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी स्थानिक संस्थांशी समन्वय या क्षेत्रात डॉ. देशमुख यांनी चांगले काम केले आहे.

गडचिरोलीतील भामरागड परिसरात आदिवासी मुलांची शाळांमधील उपस्थिती वाढावी तसेच त्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या अश्विनी सोनावणे यांना बिगर सरकारी या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कांदळवनाच्या जतनासाठी धडपडणारे एन. वासुदेवन आणि निसर्ग पर्यटन, क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या जितेंद्र रामगावकर यांनाही पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरस्कार विजेत्यांच्या निवडीसाठी माजी मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या अध्यक्षतेखाली ज्युरी मंडळात ‘एचडीएफसी’ बँकेचे संस्थापक दीपक पारेख, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, ‘जेएसडब्ल्यू फाऊंडेशन’च्या अध्यक्षा संगीता जिंदाल, सनदी अधिकारी आनंद लिमये यांचा समावेश होता.