सातवी पास संतोष पांडय़े यांचे ‘कर्मायन’ पुढच्या महिन्यात बाजारात

अंगी चिकाटी, अभ्यासू वृत्ती आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर कोणतीही व्यक्ती उच्च पदावर पोहोचू शकते. याचेच उत्तम उदाहरण विलेपार्ले येथील संतोष पांडे या पुस्तक विक्रेत्याने दाखवून दिले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्याने सातवीतच शिक्षण सोडून पोटापाण्यासाठी मुंबईत आलेल्या संतोषने जुन्या पुस्तकांचे दुकान टाकले. पण ज्ञान मिळवण्याची आपली आवड त्याने कमी होऊ दिली नाही. हाती मिळेल ते पुस्तक वाचत आपले अनुभवविश्व समृद्ध करणाऱ्या संतोषने आता स्वत:च एक पुस्तक लिहिले असून त्याची ‘कर्मायन’ ही कादंबरी पुढील महिन्यात भारतभर प्रकाशित होणार आहे.

विलेपार्ले येथील ईर्ला या भागातील पे-अ‍ॅण्ड-पार्क या छोटय़ाशा रस्त्याजवळ संतोष पांडय़े यांचे जुन्या पुस्तकांचे दुकान आहे. अगदी छोटय़ा आणि निमुळत्या या दुकानात हजारो इंग्रजी पुस्तकांचा खजिना आहे. घरची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने शाळेचे पाच रुपये इतकेशुल्क घरच्यांना भरता न आल्याने फक्त १३ व्या वर्षी संतोष यांनी मुंबई गाठली आणि मुंबईतील आपल्या नातेवाईकांच्याकडे राहू लागले. नातेवाईकांचा पुस्तक विक्रीचा व्यवसाय असल्याने तेही या व्यवसायात उतरले. पण आपली वाचनाची गोडी त्यांनी कमी होऊ दिली नाही. दुकानात मिळेल ते पुस्तक वाचण्याचा सपाटा त्यांनी चालवला. त्यातून त्यांच्या ज्ञानात भर पडू लागली आणि कल्पनाविश्वही विस्तारत गेले.

वाल्मीकी, तुलसीदास यांनी लिहिलेले रामायण आणि नेपाळच्या एका लेखकाने लिहिलेल्या रामायणाचे वाचन केल्यानंतर संतोष यांच्या डोक्यात रामायणातील पात्रे घोळू लागली. यातूनच त्यांनी पौराणिक कथेवर पुस्तक लिहिण्याचा निर्धार केला. हे लिहिताना त्यांनी रावण या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवले. रावण लंकाधीश कसा बनला, याची सुरस कथा त्यांनी आपल्या ‘कर्मायन’ या पुस्तकात मांडली आहे. पहिल्या भागात रावणाची कथा सांगितल्यानंतर दुसऱ्या भागात सामान्य व्यक्तींना त्यांचे कर्म कुठे घेऊन जाते, याचा विचारही त्यांनी या पुस्तकात मांडला आहे.

संतोष यांनी हे पुस्तक हिंदी भाषेत लिहिले. परंतु, ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावे, या हेतूने त्यांनी ते इंग्रजीत रूपांतरित करण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी अंधेरीतील विनोद चेरियन यांची मदत घेतली. हे दोघे जण पॅपिलोन उपाहारगृहात पुस्तकाचे काम करण्यासाठी रात्री १० ते १ किंवा त्यापेक्षा जास्त वेळ घालवत. हॉटेल मालकानेही त्यांना या कामात मोलाची साथ दिली. विनोद यांच्या घरी उशीर होत असल्यामुळे अनेक वेळा घरच्यांना त्रास होत असे पण विनोद यांनी कामात सातत्य ठेवून हिंदी पुस्तकाचे इंग्रजीत रूपांतरित केले.

दिल्लीतील पेपल्स प्रकाशनने या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे ठरवले आहे. ‘मी स्वत: प्रकाशक आणि लेखक असल्यामुळे गेली अनेक वर्षे संतोष आणि माझा संबंध आहे. मी एक पुस्तक लिहिले असून त्याचे प्रकाशन तुम्ही कराल का? असे संतोष यांनी मला विचारले, त्यानुसार मी त्यांच्याकडून कथा मागवून घेतली आणि त्यांची कथा मला खूप आवडली. यामुळे मी हे पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले,’ असे पीपल्स प्रकाशन संस्थेचे विनोद बन्सल यांनी सांगितले.

मी मीरा रोडला राहत असल्याने या पुस्तकाच्या लिखाणासाठी विलेपार्ले येथेच थांबून असायचो, तसेच कधी कधी घरीदेखील जायला वेळ मिळत नसे. यामुळे माझ्या पत्नीला, माझे इतर महिलेशी अनैतिक संबंध आहेत का, असा संशय यायचा पण आता तिचा हा संशय दूर झाला असून आता तिला माझ्याबद्दल अभिमान वाटतो.

– संतोष पांडय़े