संगणकावरील मुखपृष्ठांचे प्रमाण वाढले; बदलत्या काळानुसार वापर
कोणतेही पुस्तक डोळ्यासमोर दिसले की वाचकाची पहिली ओळख होते ती मुखपृष्ठाशी. मजकुरावरून पुस्तकाचा ‘दर्जा’ ठरवला जात असला तरी मुखपृष्ठावरील रंग, रेषा आणि पुस्तकाची मांडणी वाचकाचे लक्ष वेधून घेत असते. याच मुखपृष्ठावर गेल्या चार ते पाच वर्षांत तंत्रकलेची छाप पडल्याचे पाहायला मिळत आहे. हे प्रमाण सुमारे ५० ते ६० टक्क्यांनी वाढत असल्याचे दिसून येते.
सध्या दरवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होत आहेत. यात सर्वाधिक पुस्तकेही माहितीपर, विज्ञानपर, स्वमदत, आरोग्यविषयक, आíथकविषयक आणि तंत्रज्ञानावर आधारित असतात. या सगळ्या पुस्तकांची मुखपृष्ठे संगणकावर केली जात आहेत, तर ललित साहित्याच्या पुस्तकांची मुखपृष्ठे हाताने केली जात आहेत. मात्र हे प्रमाणही कालांतराने कमी होत जात असून संगणकावरील मुखपृष्ठांचे प्रमाण वाढत आहे.
पूर्वीच्या काळी, लेखकाला जे सांगायचे आहे, ते वाचकापर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी मुखपृष्ठावरील चित्राची आवश्यकता नाही, असा विचार अनेक प्रकाशक करत असत. मात्र, कालांतराने जगभर पुस्तक सुबक पद्धतीने छापावे यासाठी प्रकरणाचे पहिले अक्षर वेलबुट्टी आणि नक्षीने करण्याचे सुरू झाले. कालांतराने ग्रंथांच्या मुखपृष्ठासाठी समर्पक चित्रयोजना करण्यात येऊ लागली. ग्रंथाचे मुखपृष्ठ चितारण्याचे काम त्या वेळच्या प्रथितशय चित्रकारांकडे सोपविले जाई. त्या वेळी महाराष्ट्रात चित्रकार दीनानाथ दलाल, शि. द फडणीस, वसंत सरवटे यांच्यासारख्या अनेक थोर मंडळींनी मराठी वाचकांना ग्रंथ व मासिकांचे मुखपृष्ठ ‘पाहायला’ शिकवले. रेषा, रंग, आकार या तिन्हीवर प्रचंड हुकमत असल्याने रसिकांसमोर ते सतत नवनव्या चित्रकृती सादर करीत राहिले. वेगवेगळे नवे प्रयोग करीत राहिले. सध्या काळाप्रमाणे मुखपृष्ठ तयार करण्याचे माध्यम बदलत आहे. ते बदलायलाही हवे. मात्र हाताने काढलेला चंद्र आणि मशीनवर काढलेला चंद्र यात बराच फरक आहे, असे मत जाणकार नोंदवत आहेत.

सध्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मुखपृष्ठात अनेक बदल सहज केले जाऊ शकतात. त्यामुळे हा पर्याय निवडला जात आहे. त्यामुळे संगणकावरील मुखपृष्ठ करणाऱ्या आणि हाताने मुखपृष्ठ करणाऱ्या दोन्ही कलावंतांच्या संवेदनशीलतेत फरक केला जाऊ शकत नाही. याची प्रचीती वंदना मिश्र यांचे ‘मी.. मिठाची बाहुली’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून लक्षात येते. यात दोन्हींचा संगम दिसतो. सध्या अललित पुस्तकांची मुखपृष्ठे संगणकावर केली जात आहेत.
– डॉ. सदानंद बोरसे, संपादक, राजहंस प्रकाशन

गेल्या दोन वर्षांत ‘ग्रंथाली’ने सुमारे २०० पुस्तके प्रकाशित केली आहेत. यातील तब्बल ८० टक्के पुस्तकांची मुखपृष्ठे संगणकावर करण्यात आली आहेत. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाची उपयुक्तता लक्षात घेऊन हे नवे माध्यम अवलंबले जात आहे.
– सुदेश हिंगलासपूरकर, ग्रंथाली प्रकाशन