काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. नोटाबंदीनंतर देशभरात बँकांसमोरील रांगांमध्ये जवळपास ७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. आजच्या घडीला देशभरातील लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर त्यांच्याकडे जेवण, औषधे आणि दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही पैसे राहिले नाहीत, असेही निरुपम म्हणाले.

नोटाबंदीनंतर देशातील लोकांना बँकांसमोरील लांब रांगांमध्ये दिवसभर उभे राहावे लागत आहे. आपलेच पैसे जमा आणि काढण्यासाठी त्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यांचे पैसे बँकांमध्ये अडकले आहेत. नोटाबंदीनंतर आतापर्यंत जवळपास ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, असेही संजय निरुपम यांनी सांगितले. या लोकांच्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही निरुपम यांनी यावेळी केली.

काँग्रेसतर्फे नोटाबंदीच्या मुद्द्यावर बोलावण्यात आलेल्या नोट पे चर्चा या कार्यक्रमात संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. शेकडो लोकांनी काँग्रेसच्या या चर्चेत सहभाग घेतला. त्यात बँकांच्या रांगांमध्ये उभे राहिलेले लोकही मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. नोटाबंदीनंतर एकेक पैशांसाठी कशा प्रकारे संघर्ष करावा लागला, त्यासाठी झालेला त्रास याबाबत लोकांनी आपले मुद्दे मांडले. कसेतरी २००० रुपयांच्या नवीन नोटा मिळाल्या. पण आता सुट्टे पैसे मिळत नाहीत. आतापर्यंत जवळपास ५ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले आहेत. पण लोक केवळ २५ टक्केच पैसे काढू शकले आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी हलाखीची होत आहे, असेही निरुपम यांनी सांगितले.

सरकारने अचानक नोटाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी पुरेशी तयारी करायला हवी होती. ती तयारी केली नसल्याने हजारो लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी आणखी चलन उपलब्ध करून दिले पाहिजे. नोटाबंदीनंतर लोकांना खूपच त्रास होत आहे, ही बाबही निरुपम यांनी निदर्शनास आणून दिली. याशिवाय व्यापाऱ्यांनाही या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. हॉटेल, दुकाने, मॉल, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स आदी व्यवसायांमध्ये घट झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे उत्तर द्यायला हवे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.