कित्येक पुस्तकालये बंद होण्याच्या मार्गावर; तोटय़ात दुकाने चालविणे अवघड

समाजमाध्यमांच्या रेटय़ात ग्रंथवाचन रोडावत चालल्याची ओरड अलीकडच्या काळात होत आहे. परंतु दिल्लीतील विश्व ग्रंथमेळ्यातील गेल्या काही वर्षांत आक्रसत चाललेल्या पुस्तकबाजारापाठोपाठ मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागांत प्रामुख्याने प्रभावी असलेल्या मराठी ग्रंथव्यवहारालाही लागलेल्या ओहोटीने  यावर जणू शिक्कामोर्तबच केले आहे. गेली काही वर्षे मराठीजनांची वाचनभूक भागविणारी पुस्तकालये आता बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.

मराठी ग्रंथव्यवहार हा शहरी भागात, त्यातही प्रामुख्याने पुणे-मुंबईमध्येच प्रभावी आहे; परंतु याच ठिकाणी अलीकडच्या काही वर्षांत नामवंत ग्रंथदुकाने एकतर बंद झाली आहेत किंवा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे वास्तव आहे. मुंबईतील बोरीवलीच्या वजिरा नाक्याजवळ २००३ साली सुरू होऊन अल्पावधीत ख्यातकीर्त झालेले ‘शब्द द बुक गॅलरी’ हे पुस्तकाचे दुकान येत्या महिन्यात बंद होत आहे. तर दादरमधील ‘मॅजेस्टिक बुक हाऊस’ हे दुकानही बंद होणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय ‘पालेकर’, ‘बुऱ्हाणपूरवाला’ अशी दुकाने तर कधीच इतिहासजमा झाली. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील ‘स्ट्रँड’ या इंग्रजी पुस्तकांच्या दुकानाने पूर्णविराम घेतला, तर त्याआधी ‘दनाई’, ‘न्यू अ‍ॅण्ड सेकंड हॅण्ड बुक शॉप’, ‘कोकीळ अ‍ॅण्ड कंपनी, ‘अल्वी बुक डेपो’, ‘लॅण्डमार्क स्टोअर्स’, ‘लोटस बुक स्टोअर’ अशी एकेकाळी इंग्रजी वाचनव्यवहार प्रवाही ठेवणारी पुस्तकालयेही बंद झाली. ‘शब्द’चे येशू पाटील यांना त्याविषयी विचारले असता, ते म्हणाले की, मुंबईतील पश्चिम उपनगरांत वाचन करणारा वर्ग कमी होत चालला आहे. कोणत्याही ग्रंथदुकानासाठी त्याचे ठिकाण कळीची भूमिका बजावते, हे सांगून त्यांनी आंबेडकरी समाज वाचनव्यवहारात अग्रभागी असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचले तर व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, असे ते म्हणतात. पुण्यासारख्या ठिकाणी तर पुस्तकांच्या दुकानांची होणारी पिछेहाट हा घडता इतिहास आहे. भावे पुस्तक भांडार, अभिनव पुस्तक मंदिर यांसारखी दुकाने बंद पडली. तर आता असलेल्या दुकानांचा ग्रंथव्यवहार एकतर आक्रसलेला आहे किंवा तगून राहण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष ग्रंथविक्रीपेक्षा निराळे मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे, असे साहित्यव्यवहाराचे निरीक्षक असलेल्या विजय तरवडे यांनी सांगितले. ‘रसिक साहित्य’, ‘मॅजेस्टिक’ यांसारखी पुस्तकालये ‘पुस्तक न्या, वाचून परत आणा’ असा मार्ग चोखाळत असल्याचे तरवडे सांगतात. खासगी ग्रंथालये एकेकाळी पुण्यात ६०-७० च्या घरात होती. मोजकी अनुदानित, सार्वजनिक ग्रंथालये सोडली इतरर ग्रंथालये नामशेष झाली आहेत. ऑनलाइन पुस्तकविक्री, नवीन विषय वाचकांपर्यंत न पोहचणे आदी कारणे यामागे आहेत. परंतु वाचकांपर्यंत पोहचण्याचे अभिनव मार्ग अवलंबणारी पुस्तकालये मात्र काही प्रमाणात वाचकांना आकर्षित करत असल्याचेही ते सांगतात.

प्रत्येक प्रकाशकांच्या काही पुस्तकांना, विशिष्ट लेखकांची पुस्तकांना नेहमीच मागणी असते. मात्र त्या खपावू पुस्तकांच्याच नक्कलप्रती आता मुंबई-ठाण्यातील स्थानिक परिसरातील विक्रेत्यांकडे दिसतात. ती तिथे स्वस्तात मिळतात. त्यामुळे वाचक तिथून खरेदी करतात. महाराष्ट्राच्या काही भागांत प्रकाशकांचे काही वितरक असत, त्यांची संख्याही कमी झाली आहे.   – शशिकांत सावंत, ग्रंथसंग्राहक

पुस्तकाची दुकानं बंद झाल्याच्या बातम्या ऐकतो आपण; पण खोलवरचा शोध घेतला तर आढळेल की, बहुतांश वेळा त्यामागचं कारण वाचकांचा तुटवडा हे सोडून दुसरेच काही असते. भरपूर दर्जेदार पुस्तके, पुस्तकांबद्दलची भरपूर माहिती असणारे आणि ग्राहकाला उत्साहाने ती देणारे पुस्तकप्रेमी विक्रेते आणि सातत्याने अभिनव साहित्यिक कार्यक्रम या गोष्टी सातत्याने केल्या तर पुस्तकाच्या दुकानाला ग्राहकांचा तुटवडा पडत नाही. या गोष्टी न करता ग्राहकांनी आपल्या दुकानात गर्दी करावी अशी अपेक्षा करणारी दुकाने बंद पडत असावीत. इतर कोणत्याही व्यवसायासारखा अपार कष्ट, ऊर्जा आणि व्यावसायिक वृत्तीची गरज असणारा हा व्यवसाय आहे. नव्या युगाची विपणनाची तंत्रे आत्मसात न करता ग्राहक तुमच्याकडे धावतील ही अपेक्षाच चूक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही त्यांना नुसते ‘सॅटिसफाय’ न करता ‘डिलाइट’ केले तरच ग्राहकांची निष्ठा आणि पुन:पुन्हा खरेदी घडते हे समजून घ्यायला हवे.  – संजय भास्कर जोशी, ‘पुस्तकपेठ’

ग्रंथविक्रीत व्यवस्थापन हा भागही महत्त्वाचा आहे. ते नसेल तर त्याचा परिणाम व्यवसायावरही होतोच. नवी पिढीही या व्यवसायाच्या एकूण स्वरूपामुळे आणि त्यातील आर्थिक कोंडीमुळे इकडे वळताना दिसत नाही. दुसरे म्हणजे, ऑनलाइन ग्रंथखरेदी इंग्रजीत जास्त होत असली, तरी येत्या काळात मराठीतही तिचे प्रमाण वाढेल. परिणामी ग्रंथदुकाने आता वाढण्याऐवजी कमीच होण्याची चिन्हे आहेत. – अशोक कोठावळे, मॅजेस्टिक ग्रंथदालन