गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीपासून कोकणाकडे रवाना होणाऱ्या विशेष गाडय़ांचे आरक्षण फुल्ल झाले असून आता प्रवाशांची भिस्त विशेष अनारक्षित गाडय़ांच्या घोषणेवर आहे. तसेच या गाडय़ांची प्रतीक्षा यादीही ४००च्या पुढे गेल्यामुळे अनेक प्रवाशांना जादा भाडे मोजून बसमार्गे गाव गाठावे लागणार आहे.
गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दर वर्षी वाढत आहे. गेल्या वर्षी मध्य रेल्वेने २१४ जादा गाडय़ा चाकरमान्यांसाठी सोडल्या होत्या. यंदा ही संख्या २२४ असेल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले होते. त्यापैकी दीडशेहून अधिक गाडय़ांची घोषणा याआधीच झाली आहे. या गाडय़ांपैकी गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी कोकणाकडे निघणाऱ्या गाडय़ांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. तसेच या गाडय़ांची प्रतीक्षा यादीही ४००च्या पल्याड पोहोचली आहे. त्यामुळे जास्त दिवस सुटी काढून गणेश चतुर्थीच्या तीन-चार दिवस आधीपासून गावाला जाणे किंवा
बसगाडय़ांवर अवलंबून राहणे, हे दोनच पर्याय कोकणवासीयांसमोर आहेत.
४०० नंतर आरक्षण बंद
नव्या नियमांप्रमाणे प्रतीक्षा यादी ४००च्या पुढे जात नाही. प्रतीक्षा यादी ४०० पर्यंत पोहोचल्यावर त्या गाडीचे आरक्षण बंद होते. त्यामुळे अनेक चाकरमान्यांना या गाडय़ांचे आरक्षणही मिळालेले नाही. आता रेल्वेने अनारक्षित गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला किंवा नवीन विशेष आरक्षित गाडय़ांची घोषणा केली, तरच या प्रवाशांची सोय होणार आहे.