News Flash

आश्रमशाळांमधील विद्यार्थी तीन महिने अनवाणी

बूट खरेदीच्या घोळाचा फटका

बूट खरेदीच्या घोळाचा फटका

राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना यंदा वेळेत बूट न मिळाल्यामुळे तीन महिने अनवाणी पायपीट करावी लागली. एका कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करून आदिवासी विकास विभागाने दुसऱ्या कंपनीकडून बूट खरेदी केले. पण या घोळात विद्यार्थ्यांना बूट मिळायला ऑगस्ट महिना उजाडला.

राज्यातील सर्वच शाळा जूनमध्ये सुरू होतात. त्या आधीच आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश, वह्य़ा, पुस्तके, मिळणे अपेक्षित आहे. मात्र आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वस्तूंची वेळेत कधीच खरेदी होत नाही, अशा तक्रारी आहेत. पावसाळा संपत आल्यानंतर रेनकोट खरेदी केले जातात, थंडी कमी झाल्यानंतर स्वेटर विकत घेतले जातात, असे प्रकार या पूर्वी घडलेले आहेत. त्यावर विधिमंडळातही अनेकदा चर्चा झाली आहे. या वर्षी बूट खरेदीचा घोळ पुढे आला आहे. मात्र त्याला संबंधित शासकीय कंपनी जबाबदार असल्याचे आदिवासी विकास विभागातील सूत्राचे म्हणणे आहे.

राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये १ लाख ९३ हजार विद्यार्थी शिकत आहेत. गणवेशाचा एक भाग म्हणून त्यांच्यासाठी बूट पुरवठा करण्याचे कंत्राट मे २०१६ मध्ये चर्मोद्योग विकास महामंडळ (लिडकॉम) या शासकीय महामंडळाला देण्यात आले होते. मात्र या कंपनीकडून जुलैपर्यंत बूट मिळाले नाहीत. त्यामुळे निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून दुसऱ्या कंपनीला कंत्राट देऊन बूट खरेदी करावे लागले. त्या कंपनीकडून बूट मिळायलाही ऑगस्टचा महिना उजाडला. आदिवासी विभागाकडून वेळेत बूट खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, परंतु लिडकॉमकडूनच त्याचा वेळेत पुरवठा केला गेला नाही, असे सांगण्यात आले.

मात्र आता आम्ही तयार केलेले बूट खरेदी करावेत, असा तगादा लिडकॉमनेही लावला आहे. प्रकरण न्यायालयातही गेले आहे. त्यामुळे पुढील वर्षांसाठी लिडकॉमने तयार केलेले बूट खरेदी करण्याची आदिवासी विकास विभागाने तयारी दर्शविली आहे. मात्र या सर्व घोळात आदिवासी विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन तीन महिने बुटाशिवाय काढावे लागले. या संदर्भात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 12:13 am

Web Title: boots shopping scam
Next Stories
1 यंत्रणेवर विश्वास नसेल तर व्यवस्था मोडून काढा, उद्धव ठाकरेंचा जेटलींना टोला
2 नोटाबंदीचा निर्णय जनहिताचा, सरकारला सहकार्य करा – मुंबई हायकोर्ट
3 नोटाबंदीचा फटका, ठाण्यात उद्या दुध नाही ?
Just Now!
X