दृष्टीहिनांना बोरिवली स्थानकात भेडसावणाऱ्या दररोजच्या अडचणी आता लवकरच इतिहासजमा होणार आहेत. स्थानकातील पादचारी पुलाचे कठडे, स्थानकाचे प्रवेश व निर्गमन ही ठिकाणे, भूयारी मार्गातील कठडे यांवर ब्रेल लिपीतील मजकूर कोरण्यात आला आहे. तसेच ब्रेल लिपीतील मजकुराच्या माहितीपर
पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त कॉक्स अॅन्ड किंग्ज फाऊंडेशन, अनुप्रयास आणि पश्चिम रेल्वे यांनी संयुक्तपणे बोरिवली स्थानकात काही उपक्रम राबवले.

कॉक्स अॅन्ड किंग्ज कंपनी ही जगातील सर्वात जुनी व आघाडीवर असलेली प्रवासी कंपनी आहे. या कंपनीने सामाजिक कार्यांसाठी फाऊंडेशनची स्थापना केली आहे. अनुप्रयास ही दृष्टीहिनांसाठी अनुरुप असे पहिले रेल्वे स्थानक निर्माण करण्यासाठी झटणारी संस्था आहे. दृष्टीहिनांसाठीचे उपक्रम सुरू करण्याचा कार्यक्रम 28 सप्टेंबर रोजी बोरिवली रेल्वे स्थानकात आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, कॉक्स अॅन्ड किंग्ज कंपनीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन व सीएसआर विभागाचे उपाध्यक्ष थॉमस सी. थोट्टातील आणि अनुप्रयास संस्थेचे संस्थापक व मुख्याधिकारी पंचम काजला यांच्या हस्ते झाले.

दिव्यांगांसाठी मुंबईमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये, दृष्टीहिनांना कोणत्या समस्यांना रेल्वे प्रवासात तोंड द्यावे लागते, हे नमूद करण्यात आले होते. प्लॅटफॉर्म ओळखता येणे ही दृष्टीहिनांची सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येमुळे त्यांच्या गाड्या चुकतात. प्लॅटफॉर्म वेळीच ओळखता न आल्याने उशीर झाल्यास दिव्यांग व्यक्ती चालत्या गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत. त्यातून अपघात व मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले. स्थानकाचा नकाशा माहीत नसल्याने तेथे असलेल्या विविध सोयी-
सुविधांचा लाभ दृष्टीहिनांना घेता येत नव्हता.

स्थानकात विशेष इंडिकेटर उभारणे आणि माहितीपर पुस्तिका निर्माण करणे यातून दृष्टीहिनांच्या या समस्यांवर उपाय शोधण्यात आला आहे. स्थानकाची माहिती ब्रेल लिपीतून आपसूकच मिळाल्याने दृष्टीहीन व्यक्तीला अनोळखी व्यक्तींशी संभाषण करण्याची गरज उरणार नाही. या पुस्तिकेमध्ये आपत्कालीस प्रसंगी वापरावयाचे दूरध्वनी क्रमांकही देण्यात आले आहेत. ही पुस्तिका सर्व तिकीट खिडक्यांवर उपलब्ध असेल.

दृष्टीहिनांची सर्वात मोठी लोकसंख्या भारतात आहे. भारतातदेखील दिव्यांगांमध्ये दृष्टीहिनांची संख्या जास्त आहे. भारतातील एकूण लोकसंख्येतील एक टक्का नागरिकांना दृष्टीसंबंधी समस्यांना तोंडद्यावे लागते. मुंबईत लोकसंख्या जास्त असल्याने साहजिकच येथे दृष्टीहिनांची संख्याही जास्त आहे.
त्यांना रेल्वेतून मोकळेपणाने व विनासायास फिरता यावे, यासाठी रेल्वे खात्याने तज्ज्ञ व आर्थिक मदतनीस यांच्या सहाय्याने ‘मुंबई रेल नेटवर्क’ विकसीत केले आहे. मुंबईतील तसेच बाहेरगावांहून आलेले प्रवासी बोरिवली स्थानकाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे या स्थानकाचा प्रथम विचार करण्यात आला. पश्चिम रेल्वेंमध्ये स्पर्श संवेदना असणारे फ्लोअरिंग मुळातच उपलब्ध आहे.