शनिवारी संध्याकाळी बोरीवली पश्चिमेकडील शिंपोली रोडवरील धर्मक्षेत्र या इमारतीला लागलेल्आ भीषण आगीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जया रमेश घरसिया (५५) असं मृत महिलेचं नाव आहे. धुरामुळे गुदमुरून तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. तर अन्य एका महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टारांकडून सांगण्यात आले. लक्ष्मी यरोला असं उपचार सुरू असलेल्या महिलेचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास चौदा मजली धर्मक्षेत्र इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत अर्ध्या तासाच आगीवर नियंत्रण मिळविले. धुरामुळे गुदमरल्याने दोन महिलांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान जया घारसिया यांचा मृत्यू झाला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.