News Flash

डोंबिवली, घाटकोपरनंतर आता बोरिवलीत जनौषधी दुकान

पश्चिम उपनगरांमध्ये बोरिवलीत जनौषधीचे अधिकृत उद्घाटन होणे बाकी आहे.

अर्थसंकल्पात जेनेरिक औषधांच्या दुकानांची संख्या वाढवण्याचे उद्दिष्ट केंद्रीय सरकारने स्पष्ट केल्यानंतर जनौषधी दुकाने सुरू करण्यासाठी मुंबईतून अनेक अर्ज सादर होत असून डोंबिवली, घाटकोपरनंतर नुकतेच बोरिवलीत जनौषधी दुकान सुरू होत आहे. जनौषधीचा फलक लावल्यावर लगेचच ग्राहकांकडून औषधांची विचारणा सुरू होत असल्याचा अनुभव दुकानदारांना येत आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांवरील महागडय़ा औषधांनी पिचलेल्या रुग्णांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून कमी किमतीतील जेनेरिक औषधांच्या पुरवठय़ाची मागणी गेली अनेक वर्षे सुरू होती. आरोग्य क्षेत्रातील अनेक सामाजिक संस्थाही सातत्याने या औषधांची मागणी करीत होत्या. पंजाब, छत्तीसगढ आणि ओडिसा आदी राज्यांनंतर आता देशभरात जनौषधी दुकानांची संख्या मार्च २०१७ मध्ये तीन हजारावर नेण्याचा संकल्प केंद्र सरकारने सोडल्यानंतर मुंबईत परिसरात दीड महिन्यात तीन जनौषधी दुकाने सुरू झाली आहेत. त्यातील पहिले दुकान डोंबिवलीतील शिरोडकर रुग्णालय येथे, दुसरे एलबीएस रस्त्यावर घाटकोपर सेवा संघ तर तिसरे बोरिवलीत भगवती रुग्णालयानजीक आहे. या तीनही दुकानांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २६ जानेवारी रोजी डोंबिवलीतील दुकानाची सुरुवात झाली आणि ग्राहकांचा प्रतिसादही मिळू लागला, असे या दुकानाचे मालक इक्बाल शेख म्हणाले. १९ फेब्रुवारीपासून घाटकोपर येथे जनौषधी सुरू केलेल्या मंजिरी तोरसकर यांचाही असाच अनुभव आहे. माहिती घेण्यासाठी, औषधे विचारण्यासाठी लोकांचे सतत फोन येत आहेत. त्यांना हव्या असलेल्या औषधांपैकी कोणती औषधे आहेत, इतर काही पर्याय आहे का त्याची आम्ही माहिती देत आहोत, असे तोरसकर म्हणाल्या.

यानंतर पश्चिम उपनगरांमध्ये बोरिवलीत जनौषधीचे अधिकृत उद्घाटन होणे बाकी आहे. मात्र गेल्या आठवडय़ात या दुकानाचा फलक लागल्यापासून लोक औषधांची मागणी करू लागले. त्यामुळे अधिकृत उद्घाटन होण्याआधीच विक्रीला सुरुवात झाली असे विजय घोसर म्हणाले. महागडे उपचार व औषधांमुळे महिन्याला हजारो रुपये खर्च कराव्या लागणाऱ्या मुंबईकरांना कमी किमतीतील औषधांची गरज आहे. ती या निमित्ताने  पूर्ण होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १५ जनौषधीची दुकाने सुरू झाली असून अनेक अर्ज येत असल्याचे जनौषधीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 1:00 am

Web Title: borivali public medicine shop
टॅग : Borivali
Next Stories
1 गिरणी कामगारांसाठी पाच हजार घरे
2 आठ हजार कोटींपेक्षा दुष्काळावर जास्त खर्च
3 गतिमंद मुलींवरील बलात्कार प्रकरणी रामचंद्र करंजुले याची फाशी रद्द
Just Now!
X