श्वानांची लोकप्रियता वाढल्यावर विशिष्ट श्वान ब्रीड उत्कृष्टरीत्या विकसित करण्यासाठी श्वानतज्ज्ञांचे वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न होऊ लागले. श्वानांची उपयोगिता, श्वानांची शारीरिक क्षमता याकडे विशेष लक्ष देत मोठय़ा प्रमाणात निरनिराळ्या जातीच्या श्वानांचे ब्रीिडग होऊ लागले. देशी श्वानांप्रमाणेच परदेशी श्वानांचा जगभरात प्रसार होऊ लागला. प्रत्येक देशातील श्वानांनी संबंधित देशाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपले वेगळेपण जपले आहे. काही श्वानांच्या उत्पत्तीचा इतिहासही तितकाच जुना. रशियातील बोरझोई जातीचे श्वान यापैकीच एक. नवव्या ते दहाव्या शतकाच्या दरम्यान झालेल्या रशियातील उत्खननात या बोरझोई जातीच्या श्वानांचे पुरावे सापडतात. पूर्वी रशियात शिकारीसाठी या जातीच्या श्वानांचा उपयोग केला गेला. बोरझोई जातीच्या श्वानांना रशियन वुल्फ हाऊंड असेही म्हणतात. वेगवेगळ्या देशातील राजांना बोरझोई श्वानांना विशेष प्रेम असायचे. शिकारीसाठी या श्वानांचा मोठय़ा प्रमाणात उपयोग होत होता. कोणत्याही कठीण परिस्थितीत तग धरून राहण्याचे या श्वानांचे वैशिष्टय़ सर्वत्र वाखाणले जाते. आजही रशियात बोरझोई श्वानांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जाते. रानडुक्कर, लांडगे आणि बकऱ्यांचे शेतावर होणाऱ्या आक्रमणापासून बोरझोई श्वान शेताचे रक्षण करतात. शारीरिकदृष्टय़ा काटक असले तरी या श्वानांची क्षमता एवढी की रानडुक्कर, लांडगे, बकऱ्या, ससे अशा प्राण्यांवर हल्ले करत हे श्वान त्यांना जिवे मारू शकतात. आपल्या निडर स्वभावामुळे बोरझोई श्वानांची जगभरात लोकप्रियता आहे. तीक्ष्ण नजर असलेल्या बोरझोई श्वानांना साइट हाऊंड असेही संबोधतात. दोन ते तीन किलोमीटरवरील शिकार पकडण्यासाठी हे श्वान तरबेज मानले जातात. ३० ते ३२ इंच या श्वानांची उंची असते. संपूर्णत: वाढ झालेले बोरझोई श्वानांचे वजन ५० किलोपर्यंत वाढते. ताशी साठ ते सत्तर किलोमीटर धावण्याच्या यांच्या वैशिष्टय़ामुळे श्वानप्रेमींचे विशेष लक्ष वेधले आहे. विशिष्ट रंग या श्वानांमध्ये आढळत नसून निरनिराळ्या रंगात बोरझोई श्वान पाहायला मिळतात. या श्वानांच्या संपूर्ण शरीरावर लहान मऊ केसांचे आवरण असते. रशियातील थंड वातावरणात तग धरून राहण्यासाठी बोरझोई श्वानांना या केसांच्या आवरणाचा उपयोग होतो. थंडीच्या वातावरणात या श्वानांच्या शरीरावरील केस वाढतात. थंडी कमी झाल्यावर हे केस कमी होतात. गाई-गुरांचे रक्षण करण्यासाठी रशियातील शेतकरी आजही बोरझोई श्वानांचा उपयोग करतात. भारतात बोरझोई श्वान कमी पाहायला मिळतात. दिल्लीमध्ये राहणाऱ्या उत्कर्ष राठोड यांच्याकडे बोरझोई जातीचे श्वान आहेत. जयपूरमध्ये काही प्रमाणात या जातीचे श्वान आढळतात.

डॉग शोजमधील शो रिंगमध्ये बोरझोई श्वान अधिक उठून दिसतात. मोठमोठय़ा शेतशिवारावर राहण्याची सवय असली तरी या श्वानांचा मुळात शांत स्वभाव असतो. रागीट स्वभाव नसल्याने कोणत्याही परिस्थितीत सावरण्याचे कसब या श्वानांमध्ये असते. त्यामुळे बोरझोई श्वान घरातही पाळता येऊ शकतात. प्रचंड शारीरिक क्षमतेसाठी उत्कृष्ट प्रथिनयुक्त आहार या श्वानांना मिळणे आवश्यक आहे. मांसाहार या श्वानांना दिल्यास उत्तम ठरतो. मात्र या श्वानांचे शारीरिकदृष्टय़ा दिसत नसले तरी वजन लगेच वाढते. वजन वाढल्यास या श्वानांची हालचाल कमी होते.

ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट

रशियामध्ये बोरझोई श्वानांच्या वुल्फ हंटिंगच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. एकटय़ा श्वानाने दोन ते तीन लांडग्यांना मारल्यास त्या बोरझोई श्वानांना ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट दिले जाते. विशिष्ट वयोगटात आल्यावर रेग्युलर हंटिंग डिप्लोमा या श्वानांसाठी आयोजित केला जातो.