नमिता धुरी

उन्हाळी आणि दिवाळी सुट्टी हे बालरंगभूमीचे दोन्ही हंगाम यंदा करोना टाळेबंदीमुळे कोरडे गेले. बालनाटय़ांचे सुरू असलेले प्रयोग तर थांबलेच आणि नवी बालनाटय़ेही येऊ शकली नाहीत. शिवाय, बालनाटय़ शिबिरे, अभिनय आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळाही रद्द कराव्या लागल्याने बालनाटय़ व्यवहारांवर दूरगामी परिणाम झाले आहेत.

अनेक संस्था दरवर्षी शाळांमध्ये आणि खासगीरीत्या बालनाटय़ शिबिरे भरवतात. नाटय़कलेत गती असणाऱ्या मुलांना घेऊन बालनाटय़े केली जातात. यातून भाषिक संस्कारांबरोबरच मुलांचा व्यक्तिमत्त्व विकासही साधला जातो. मात्र, या वर्षी लहान मुलांच्या घराबाहेर पडण्यावर करोनामुळे निर्बंध आले. बालनाटय़ांचे प्रयोग थांबले. परिणामी बालरंगभूमीचे सांस्कृतिक आणि आर्थिक नुकसान झाले.  मुंबईत दर वर्षी दिवाळी सुट्टीत बालनाटय़ांचे ९० ते १०० प्रयोग होतात. त्यापैकी निम्मे प्रयोग पुण्यात, तर काही प्रयोग नाशिकला होतात. मुंबईत दिवाळीत होणाऱ्या प्रयोगांच्या दुप्पट बालनाटय़प्रयोग उन्हाळी सुट्टीत होतात, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेचे राजू तुलालवार यांनी दिली. बालनाटय़ांद्वारे हजारो शब्द मुलांना नव्याने समजतात, असेही ते म्हणाले.

आता दहावीची परीक्षा एप्रिल-मेपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. इतर इयत्तांच्या परीक्षा कधी होतील याबाबत काही सांगता येत नाही. महिन्याभरात बालनाटय़ उभे राहू शकत नाही, असे ‘गंधार कलासंस्थे’चे मंदार टिल्लू यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे मराठी कच्चे असते, त्यामुळे त्यांच्याकडून भरपूर वाचन करून घ्यावे लागते. मुलांचे मन चंचल असते. इतक्या महिन्यांनंतर त्यांचे मन इतर गोष्टींकडे ओढले जाईल. त्यामुळे टाळेबंदीनंतर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. मंदार टिल्लू यांनी काव्यवाचन, कवितेवर आधारित नृत्य सादरीकरण, असे ऑनलाइन उपक्रम मुलांसाठी सुरू ठेवले आहेत. परंतु बालनाटय़ ही सांघिक कला असल्याने ती ऑनलाइन शिकवता येत नाही. सरावात मोठा खंड पडल्यानंतर कलेचे विस्मरण होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

‘बालरंजन कें द्रा’चे देवेंद्र भिडे यांनीही हावभाव, आवाजाचे व्यायाम, उच्चार, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा इत्यादींविषयीचे प्रशिक्षण ऑनलाइन सुरू ठेवले आहे. प्रत्येक शिबिरातून ५-६ तरी बाल कलाकार मिळतात. प्रेक्षकांसमोर काम करताना त्यांच्यात सभाधीटपणा येतो. प्रयोगानंतर त्यांच्याच वयाची मुले येऊन बालकलाकारांसह छायाचित्र काढतात. हा एक वेगळा अनुभव असल्याचे भिडे यांनी सांगितले. पुढील वर्षी एप्रिलमध्ये बालनाटय़ करतानाही १५ वर्षांखालील मुलांच्या सहभागावर निर्बंध येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

सध्या बालनाटय़ प्रयोग थांबले असले तरी रंगभूषा, वेशभूषा या नाटय़कलेच्या अंगांविषयी मुलांना ऑनलाइन मार्गदर्शन केले जात आहे.

– राजू तुलालवार, बालरंगभूमी परिषद

२० ते २५ जुनी आणि सहा नवी बालनाटय़े यंदा रंगभूमीवर येऊ शकली नाहीत. त्यामुळे निर्मिती संस्थांना आर्थिक नुकसान सोसावे लागले.

– मंदार टिल्लू, गंधार कला संस्था

प्रत्येक बालनाटय़ शिबिरातून पाच-सहा बाल कलाकार मिळतात. परंतु यंदा करोना टाळेबंदीमुळे कलाकार घडण्याची प्रक्रियाच थांबली आहे.

– देवेंद्र भिडे, बालरंजन केंद्र

* राजू तुलालवार यांच्या ‘चिल्ड्रेन्स थिएटर अ‍ॅकॅ डमी’ची ‘रोबो आणि राक्षस’, ‘दाढी, मिशी, शेंडी’, ‘नाचणारे झाड’, ‘माकडाची शाळा’, ‘हिप्पीप हुर्रे’, ‘ब्रह्मराक्षस’ ही नाटके  उन्हाळी सुट्टीत रंगभूमीवर पुन्हा दाखल होणार होती.

* मंदार टिल्लू यांच्या ‘गंधार कलासंस्थे’च्या दोन ते चार वर्षांपासून सुरू असलेल्या नाटकांचे प्रयोग थांबले आहेत.

’‘व्यक्ती आणि वल्ली’चे २५, ‘जंतर-मंतर पोरं बिलंदर’चे २५, ‘नवे गोकु ळ’चे ५०, ‘बँक ऑफ बालपण’चे १०० प्रयोग झाले आहेत. यात साधारण १०० बालकलाकार काम करतात.

टाळेबंदीचा परिणाम काय?

काहींनी चिकाटीने आणि कष्टाने बालरंगभूमीचे अस्तित्व टिकवले आहे. परंतु यंदा करोना टाळेबंदीमुळे बालरंगभूमीलाही फटका बसला. टाळेबंदीचा परिणाम बालकलाकारांना संधी, व्यासपीठ मिळण्यावर आणि नवे बालकलाकार घडण्यावर झाला. बालनाटय़ांचे प्रयोग थांबले, तालमीही थांबल्या. बालरंगभूमीचे सांस्कृतिक आणि आर्थिक नुकसान झाले.

बालनाटय़े, कार्यशाळांचे

महत्त्व काय? दरवर्षी उन्हाळी आणि दिवाळी सुट्टीत बालनाटय़ाचे प्रयोग होतात. याच दोन सुट्टय़ांमध्ये बालनाटय़ शिबिरे घेतली जातात. त्यातून अभिनयाचे पाठ देण्याबरोबरच मुलांमध्ये सभाधीटपणा निर्माण करण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यातून नवे बालकलाकार घडतात.