प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या जेरिट जॉन याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. जॉन हा दूरचित्रवाणी क्षेत्रात कार्यरत असून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील सायकलस्वार प्रेयसीवर तीन वर्षांपूर्वी अ‍ॅसिड फेकले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृशाली जोशी यांनी जॉनला घरात घुसून प्रेयसीला गंभीरदृष्टय़ा इजा केल्याच्या आरोपामध्ये दोषी धरत त्याचा पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच २० हजार रुपयांचा दंडही सुनावला. दंडाची ही रक्कम त्याच्या प्रेयसीला देण्यात येईल. जॉनवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपही ठेवण्यात आला होता. मात्र न्यायालयाने त्याला हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात निर्दोष ठरवले.