मला पैसे दिले नाहीत तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी विकी नावाच्या तरुणाला त्याच्या विवाहित प्रेयसीने दिली. विकी घाबरला आणि त्याने प्रेयसी व तिच्या मुलीची हत्या केली.

[jwplayer S3MyjEmk]

दहिसरला राहणारा विकी प्रचंड तणावात होता. आपल्या आयुष्यात असं काहीसंकट येईल याची त्याने कल्पनाही केलेली नव्हती. आपलं करियर बरबाद होईल, आयुष्य संपेल याची भीती त्याला होती. या भीतीचं कारण होतं त्याच्या विवाहित प्रेयसीने दिलेली धमकी. गेल्या आठ महिन्यांपासून विकीचे (२२) दीपिका संघवी (२९) हिच्याशी प्रेमसंबंध होते. दीपिका विवाहित होती आणि तिला आठ वर्षांची मुलगी होती. पण ती पतीपासून विभक्त झालेली होती. एकाच कॉल सेंटरमध्ये काम करताना विकी आणि दीपिकाची ओळख झाली होती. विकी दीपिकाच्या प्रेमात आकंठ बुडालेला होता. पण प्रेमाच्या नवलाईचे रंग उतरल्यावर दीपिका आता विकीला पैशांसाठी ब्लॅकमेल करायला लागली होती. मला जर २० हजार रुपये नाही दिलेस तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी तिने दिली होती. या धमकीमुळे विकी पुरता कोलमडला होता. जर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, तर सगळं आयुष्यच उद्ध्वस्त होईल याची त्याला भीती होती. विकी अत्यंत साधा आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता. आपण अशा पद्धतीने कधी फसू याची त्याला कधी कल्पनाही नव्हती.

२८ जानेवारी रोजी मीरा रोडच्या गोल्डन नेस्ट येथील सोनम सरस्वती इमारतीच्या ‘जे विंग’मधील ४०१ क्रमांकाच्या फ्लॅटमधून दरुगधी येऊ  लागल्याने रहिवाशांनी पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी फ्लॅटचं दार उघडून आत प्रवेश केल्यावर त्यांना हॉलमध्ये कुजलेल्या अवस्थेत दीपिका संघवीचा मृतदेह आढळला, तर बेडरूममध्ये लोखंडी पलंगाच्या आत ८ वर्षांच्या चिमुकली हेतवीचा मृतदेह आढळला. मायलेकीच्या या दुहेरी हत्येने खळबळ उडाली होती. कुणी केली होती दीपिकाची हत्या?  नवघर पोलिसांबरोबर ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, काशिमीरा युनिटचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन समांतर तपास सुरू केला. घरात चोरी झालेली नव्हती, त्यामुळे वैयक्तिक कारणांमुळे ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. चारच महिन्यांपूर्वी या इमारतीत दीपिका मुलीसह भाडय़ाच्या घरात राहायला आली होती. त्यामुळे कुणाला त्यांच्याबाबत माहिती नव्हती.

घटनास्थळी पोलिसांना दीपिकाचा मोबाइल मिळाला. शेवटचा कॉल तिने मानसी नावाच्या तिच्या मैत्रिणीला केला होता, तसेच मी पतीसह महाबळेश्वरला काही दिवसांसाठी जात आहे, असा संदेशही मानसीला केला होता. आरोपीने दिशाभूल करण्यासाठी दीपिकाच्या मोबाइलमधून हा संदेश पाठवला होता हे उघड होते. पोलिसांनी मानसीकडे चौकशी केली. तेव्हा तिचा प्रियकर विकी तिला भेटायला घरी येत असे, अशी माहिती तिने दिली. पण विकी अत्यंत चांगला आणि दीपिकावर खूप प्रेम करणारा होता. तो असे काही कृत्य करणार नाही हेदेखील तिने ठामपणे सांगितले. पोलिसांचा संभ्रम वाढला. पोलिसांनी दीपिकाचा विभक्त झालेला पती कार्तिककडे चौकशी केली. आम्ही वेगळे राहतो, तेव्हा एकत्र महाबळेश्वरला जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी कार्तिकची कसून चौकशी केली पण त्याचा कुठलाच सहभाग असल्याचे आढळून आले नाही

नवरा कार्तिक संशयाच्या फेऱ्यातून सुटल्याने विकीवरील संशय बळावला. पोलिसांनी विनायक ऊर्फ विकी अपूरचे दहिसर येथील घर गाठले. तो आई आणि लहान भावासह राहत होता. पण दोन दिवसांपूर्वीच त्याने गोव्याला मंदिरात जातो, असे सांगून घर सोडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दीपिका राहत असलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही तपासले. २६ जानेवारीला सकाळी साडेसातच्या सुमारस विकी इमारतीच्या प्रवेशद्वारातून तोंड लपवून निघत असताना दिसला. त्या दिवसाचे त्याच्या मोबाइलचे लोकेशन तपासले, तेव्हा तो याच परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. विकीनेच दीपिकाची हत्या केल्याचा संशय बळावला.

विकीला पकडायचे कसे हा पोलिसांना प्रश्न पडला. तो एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होता. पण काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरी सुटली होती आणि तो बेरोजगार झाला होता. त्याने दोन दिवसांपूर्वी आईला गोव्याला जातो, असं सांगून आईची सोन्याची चेन मागून घेतली होती. विकीकडे पैसे नाहीत आणि तो फार काळ बाहेर लपू शकत नाही, असा पोलिसांना अंदाज होता. पोलिसांनी विकीची आई, एक मैत्रीण आणि मित्राला विश्वासात घेतले. विकी यांपैकी कुणालाशीही नक्कीच संपर्क करेल, असा त्यांना विश्वास होता. पोलिसांचा अंदाज बरोबर ठरला. विकीने त्याच्या मित्राला फोन केला आणि ३१ तारखेला दहिसरच्या रुस्तमजी शाळेजवळ येणार असल्याचे सांगितले. प्रफुल्ल वाघ यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक भूपेंद्र टेलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावला आणि विकीला ताब्यात घेतले. विकीने हत्येची कबुली दिली.

एकाच कॉलसेंटरमध्ये काम करत असताना विकी आणि दीपिकाची अवघ्या आठ महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. विकी तिला पैसेही देत होता. सप्टेंबपर्यंत विकीने दीपिकाला ४५ हजार रुपये दिले होते. पण नोकरी सुटल्याने विकीकडेच पैसे नसायचे, तेव्हा दीपिकाला पैसे देणे शक्य नव्हते. विकी दीपिकावर मनापासून प्रेम करत होता. पण तिला पैसा हवा होता. तिने त्याच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. पैसे दिले नाहीस तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी तिने दिली होती. त्यामुळे तो घाबरला होता. जर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला तर बदनामी तर होईलच, शिवाय करियरही संपेल, असं त्याला वाटायचं. २५ जानेवारीच्या रात्री तो नेहमीप्रमाणे दीपिकाला भेटायला गेले. त्या रात्री तिने पैशांच्या मुद्दय़ावरून त्याच्याशी भांडण केले. विकीने तिच्याकडे काही दिवसांची मुदत मागितली. पण ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. त्या रात्री विकीला झोपच लागली नाही. त्यामुळे तो अडीचच्या सुमारास उठला आणि झोपेत असलेल्या दीपिकाच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्याच वेळी तिची मुलगी हेतवी जागी झाली. आईच्या गळा आणि मानेवरील रक्त पाहून ती ओरडायला लागली. त्यामुळे घाबरलेल्या विकीने तिच्या गळ्यावरही चाकूचा वार करून तिची हत्या केली. तिचा मृतदेह बेडरूममधील पलंगाच्या आत गादीत लपवून ठेवला. हत्येनंतर तो दोन दिवस आपल्या घरी राहिला. जेव्हा पोलिसांनी दीपिकाचा मृतदेह ताब्यात घेतला, तेव्हा तो घरातून निघाला. आईकडून त्याने सोन्याची चेन घालायला घेतली आणि सोनाराला विकून दहा हजार रुपये घेतले. सुरुवातील तो गोव्याला गेला, तेथील समुद्रकिनाऱ्यावर मन रमवायला भटकला. तेथून शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. पण पुढे काय करायचे हे सुचत नव्हते. त्याने मित्राला संपर्क  केला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

दीपिकाने केवळ धमकी दिली म्हणून त्याने तिची आणि तिच्या मुलीची हत्या केली. तिच्या धमकीबाबत त्याने पोलीस ठाण्यात तक्रार करणे आवश्यक होते. पण कोणताही मागचा-पुढचा विचार न केल्याने त्याच्या हातून हे हत्याकांड घडले आणि दोन जिवांचा बळी गेला.

[jwplayer EbyM86cU]