मोबाइलवर कॉल करणे आणि आलेले कॉल्स स्वीकारणे या तशा सामान्य गोष्टी. ज्याचा त्याचा प्रश्न. पण एका तरुणाने दिवसभरात आपला मोबाइल न उचलल्याने थेट पोलीसच त्याच्या घरी येऊन धडकले..

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील घनदाट जंगलात पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह आढळला. गुंगीचे औषध देऊन नंतर गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती. त्या तरुणीची ओळख लगेच पटली. तिचे नाव सरला अहिरे (२७) होते. ती गोरेगावला राहणारी होती. शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. मारेकऱ्यापर्यंत नेईल असा कोणताच पुरावा नव्हता. योजनाबद्ध रीतीने त्याने या तरुणीची हत्या करण्यात आली होती.

पोलीस तपास सुरू असताना नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या. सरला गोरेगावच्या तानाजीनगर येथील नकली दागिने बनविणाऱ्या कंपनीत कामाला होती. हत्येच्या दिवशीही ती कामावर गेली होती आणि तेथून तिने दोन वेळा मेसेज पाठवून आपल्याशी संपर्क साधला होता, असे तिच्या आईने पोलिसांना सांगितले. परंतु कंपनीत चौकशी केली असता सरला त्या दिवशी कामावर आलीच नव्हती, अशी माहिती समोर आली. सरलाच्या मोबाइल कॉलचे तपशील तपासले असता, एका मोबाइल क्रमांकावर तिचे सतत बोलणे होत होते, ही गोष्ट समोर आली. तो मोबाइल क्रमांक होता सरलाचा प्रियकर प्रवीण तळटकर (३५) याचा.

पोलिसांनी प्रवीणकडे चौकशी केली तेव्हा प्रवीणने सरला आपली प्रेयसी होती, हे मान्य केले. मात्र हत्येच्या दिवशी आपण घरीच होतो आणि केवळ सकाळी आपले सरलाशी बोलणे झाले, अशी माहिती त्याने दिली. पोलिसांनी प्रवीणच्या मोबाइलचे लोकेशन तपासले तेव्हा ते त्याच्या घराजवळचे ठिकाण दाखवत होते. त्यामुळे हत्येच्या दिवशी सरलाबरोबर नॅशनल पार्क येथे कोण होता, असा प्रश्न पोलिसांना पडला.

पोलिसांनी सरलाचा पूर्वेतिहास तपासला. कार्यालयातले, शेजारचे, मित्र-मैत्रिणी, ओळखीचे यांची चौकशी सुरू केली. सरला घर आणि कार्यालय अशी नाकासमोर चालणारी तरुणी होती. फक्त प्रवीणशी तिचे प्रेमसंबंध होते. बाकी तिच्या आयुष्यात काही नव्हते, अशी माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी नॅशनल पार्कचे सीसीटीव्ही तपासले. पण त्यातही काही आढळले नाही. कुठूनच तपासाचा धागा मिळत नसल्याने पोलिसांनी आपला मोर्चा पुन्हा प्रवीणकडे वळवला. पोलिसांनी बारकाईने त्याच्या मोबाइल तपशिलाचा अभ्यास केला. सकाळी दहापासून रात्री ८ वाजेपर्यंत प्रवीणच्या मोबाइलवर २२ कॉल्स आले होते. त्यात सरलाचाही फोन होता. म्हणजे सरला त्याच्यासोबत नव्हती. पण एक गोष्ट राहून राहून पोलिसांना खटकत होती. कारण या २२ कॉल्सपैकी एकही कॉल त्याने उचलला नव्हता. विशेष म्हणजे, यादरम्यान त्याने कुणालाही फोनदेखील केला नव्हता. ज्या व्यक्तीला दिवसभरात २२ कॉल्स येतात, तो घरी असताना एकालाही प्रतिसाद देत नाही हे पोलिसांना विचित्र वाटलं.

पोलिसांनी पुन्हा प्रवीणकडे मोर्चा वळवला. तेव्हा ‘तब्येत बरी नसल्याने झोपलो होतो,’ असे त्याने पोलिसांना सांगितले. पण एखादी व्यक्ती सकाळी दहा ते रात्री इतका वेळ कशी झोपेल, हा प्रश्न पोलिसांनी त्याला केला. त्याला आलेल्या कॉल्सपैकी ३-४ सरलाचे होते. पण त्याने सरलाला पुन्हा कॉल केला नव्हता. हे सारे पोलिसांना संशयास्पद वाटले. त्यामुळे त्यांनी प्रवीणवर प्रश्नांची सरबत्ती केली. या माऱ्याने गांगरलेला प्रवीण जास्त काळ सत्य लपवू शकला नाही व त्याने सरलाच्या हत्येची कबुली दिली.

प्रवीण विवाहित होता. सरलाशी त्याचे प्रेमसंबंध होते. सरलाने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे त्याने सरलाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. हत्येच्या दिवशी, सकाळी नऊ वाजता तो सरलाला घेऊन नॅशनल पार्क येथे आला. त्यापूर्वीच त्याने गुंगीचे औषध व इंजेक्शन मेडिकल दुकानातून खरेदी केले होते. ठरवल्याप्रमाणे त्याने सरलाला गुंगीचे इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केले व नंतर तिची हत्या केली.

पोलीस आपल्या फोनचे लोकेशन तपासतील म्हणून फोन मुद्दामून घरीच ठेवला. दिशाभूल करण्यासाठी मुद्दामहून सरलाच्या नकळत तिचा फोन घेऊन तिच्या आईला मेसेज करत राहिला, सरलाच्या फोनवरून स्वत:च्या मोबाइलवर कॉल करत राहिला. प्रवीणने अशा प्रकारे पोलिसांना बराच वेळ गुंगारा दिला, पण पोलिसांच्या तपासकौशल्यापुढे त्याची डाळ शिजली नाही. कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस

निरीक्षक भरत वरळीकर, पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या पथकाने त्याला गजाआड केले.

@suhas_news

suhas.birhade@expressindia.com