चेंबूरमधील माहुलगावातील बीपीसीएलच्या रिफायनरीमध्ये बुधवारी दुपारी झालेल्या शक्तीशाली स्फोटातून मोहम्मद अन्वर हा कामगार सुदैवाने बचावला. पण त्याचवेळी या स्फोटामुळे घडलेल्या दुसऱ्या एका दुर्घटनेत मोहम्मद अन्वर जखमी झाला आहे. मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार मूळचा बिहारचा असलेला अन्वर चार महिन्यांपूर्वी नोकरीसाठी म्हणून मुंबईत आला. माहुलमधील बीपीसीएलच्या प्लांटमध्ये तो कामाला होता. प्लांटच्या शेजारीच असलेल्या गवाणपाडा झोपडपट्टीमध्ये तो भाडयांच्या घरात राहतो.

बुधवारी दुपारी रिफायनरीमध्ये स्फोट होण्याच्या काही वेळ आधी जेवणासाठी म्हणून अन्वर घरी आला होता. दुपारच्या जेवणानंतर डुलकी घेत असताना हायड्रोक्रॅकर प्लांटमध्ये शक्तीशाली स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने काही किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरुन गेला. स्फोटामुळे काही घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. भांडी आणि अन्य वस्तू खाली पडल्या. अन्वर प्लांटच्या शेजारीच राहत असल्याने स्फोटाच्या हादऱ्याने घरातील पंखा अंगावर कोसळून अन्वर जखमी झाला.

स्फोटानंतर अन्वरने स्वत:च्या बचावासाठी काही हालचाल करण्याआधीच घरातील पंखा थेट त्याच्या अंगावर येऊन पडला. या दुर्घटनेत त्याच्या नाकाला मार लागला आहे. तो आपल्या सहकाऱ्यांसह या खोलीत राहतो. घटना घडली तेव्हा अन्य सहकारी कामावर होते असे शेजाऱ्यांनी सांगितले. जखमी झालेल्या अन्वरच्या नाकातून रक्तस्त्राव होत असला तरी तो शुद्धीवर होता.

स्फोटानंतर परिसरातील सर्व मेडीकलची दुकाने बंद झाली होती. एक गाडी सुद्धा दिसत नव्हती असे अन्वरचा मित्र अनिल महतो याने सांगितले. आम्ही अन्वरला रुग्णालायकडे नेत असताना तिथे पोलिसांची गाडी दिसली. त्यांनी अन्वरसाठी गाडीची व्यवस्था करुन दिली. वाशी नाक्यावर असलेल्या रुग्णालयात अन्वरला नेण्यात आले. तिथे अन्वरच्या नाकावर टाके घालून संध्याकाळी त्याला घरी सोडण्यात आले.