उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवास्थान असलेल्या अँटिलिया इमरताबाहेर २५ फेब्रुवारी महिन्यात स्फोटकं ठेवलेली गाडी आढळून आली होती. या पोठोपाठ ५ मार्च रोजी उद्योगपती मनसुख हिरेनचा झालेला संशास्पद मृत्यू आणि या घटनांच्या तपासाअंती सचिन वाझेला झालेली अटक या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुर्णपणे ढवळून निघालेले असताना, आता आज(गुरूवार) या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला आहे व यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. तर, विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अंबानी धमकी प्रकरण: प्रदीप शर्मांच्या घरावर NIA चा छापा; अटकेची शक्यता

“प्रदीप शर्मा यांच्यावर कारवाई होईल किंवा त्यांच्यापर्यंत संशयाची सूई पोहचेल, हे अपेक्षितच होतं. कारण, ‘ब्रेन बिहाइंड द वाझे’ हे प्रदीप शर्मा आहेत, हे सर्वश्रुत होतं! त्यामुळे या दोन्ही प्रकरणांमध्ये प्रदीप शर्मांची काय भूमिका आहे? याचा तपास करण्यासाठी एनआयए त्यांच्या घरापर्यंत पोहचलेली आहे. निश्चितच या ठिकाणी अनेक गोष्टींची उकल या निमित्त तपासात मिळेल.” असं दरेकर म्हणाले आहेत.

तसेच, “प्रदीप शर्मा यांचा इतिहास तपासल्यानंतर, एकाबाजूला एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांचा नावलौकीक होत असताना, दुसऱ्या बाजुला त्यांनी कशापद्धतीने कामं केली आहेत, हे व्यापार जगत असेल, गुंडागिरी जग असेल किंबहुना वाझे सारख्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी करून घेणं असेल. त्यामुळे अँटिलिया प्रकरण असेल, वाझे प्रकरणाच्याही पलिकडे अनेक गोष्टी प्रदीप शर्माच्या चौकशीच्या माध्यमातून बाहेर येतील.” असं देखील प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवलं आहे.

हिरेन, वाझे आणि आता प्रदीप शर्मा…. समजून घ्या अँटिलिया प्रकरण आहे तरी काय?

अंबानी धमकी आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येशी प्रदीप शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे. याप्रकरणी त्यांची याआधीही चौकशी करण्यात आली असून आज सकाळी अंधेरीतील घरावर छापा टाकण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली आहे.