सोनसाखळी चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी महिला बीट मार्शलची नियुक्ती झाली असतानाच गोरेगाव पूर्व येथे एका २४ वर्षांच्या तरुणीने धाडसीपणे सोनसाखळी चोरालाच पकडून दिले आहे. या चोराशी दोन हात करताना तरुणी जखमी झाली. मात्र या धाडसाबद्दल उपायुक्त पंजाबराव उगले यांनी तिचा सत्कार केला.
माधुरी मस्के असे या धाडसी तरुणीचे नाव असून ती गोरेगाव येथील एका मॉलमध्ये नोकरी करते. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ती नोकरी आटोपून घरी जाण्यास निघाली. एमएचबी रस्त्यावर चालत असताना समोरून आलेल्या तिघा अल्पवयीन मुलांपैकी एकाने तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. परंतु प्रसंगावधान राखून माधुरीने सोनसाखळी खेचणाऱ्या मुलाची कॉलर पकडली. तोपर्यंत त्याने खेचलेली सोनसाखळी आपल्या साथीदाराकडे सोपविली होती. सुटका करण्यासाठी तो माधुरीशी झटापट करू लागला. परंतु तिने त्याची पकड सैल होऊ दिली नाही. त्याला रस्त्यावर लोळवले आणि बचावासाठी ओरडा केला. लोकांनीही लगेच संबंधित मुलाला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. इंद्रिश गिरी असे या मुलाचे नाव असून रोशन शेख, हिमांशु मालविय या साथीदारांनाही वरिष्ठ निरीक्षक जयचंद्र काठे, श्रीमंत शिंदे, सुतार आदींनी अटक केली.