दिल्लीमध्ये पावाच्या नमुन्यांमध्ये ‘पोटॅशियम ब्रोमेट’ हा घातक घटक आढळून आल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील पाव विक्रीवरही मोठा परिणाम झाला होता. सुमारे ३० टक्क्यांनी विक्री घटल्याने मुंबईतील पाव आणि ब्रेड विक्रेत्यांवर कंबरडे मोडण्याची वेळ आली होती. परंतु, कॅन्सरला निमंत्रण देणारा पोटॅशियम ब्रोमेट हा घटक वापरणे मुंबईतील पाव व ब्रेड उत्पादकांनी दहा वर्षांपूर्वीच थांबविले होते. मुंबईतल्या पावावरचे हे मळभ दूर झाल्याने आता पाव आणि ब्रेडची विक्री पूर्वपदावर येऊ लागली आहे.
१५ दिवसांपूर्वी ‘सेंटर ऑफ सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हॉयरन्मेन्ट’ (सीएसई) या संस्थेने पावाच्या ८४ नमुन्यांमध्ये पोटॅशियम ब्रोमेट हा घातक घटक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर देशभरातील ब्रेडच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात घट झाली. ब्रेडमध्ये वापरल्या जाणाऱ्या पोटॅशियम ब्रोमेट या रसायनामुळे कर्करोग होऊ शकतो.
टॉवरमध्ये राहणाऱ्यांपासून रस्त्यावर राहणाऱ्या मुंबईकरांची भूक भागवणारा पाव खाण्यासाठी मुंबईकरही धजावत नव्हते. मात्र आता पावावरील ग्रहण हळूहळू सुटू लागले आहे. ‘मुंबईत दर दिवसाला १०० टन पावाची विक्री होते. मात्र पाव असुरक्षित असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाल्यानंतर पावाच्या खपावर याचा परिणाम झाला होता. मात्र, मुंबईकरांच्या मनातील पावाबद्दलची भीती कमी होत आहे,’ असे ‘बॉम्बे बेकर्स असोसिएशन’चे एझाज मोहम्मद यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत ३० टक्क्यांनी मुंबईतील पाव विक्री कमी झाली होती. ही घट आता १० टक्क्यांवर आल्याचे ‘अखिल भारतीय ब्रेड उत्पादक संस्थेचे’ अध्यक्ष रमेश मागो यांनी सांगितले. भारतामध्ये जे बेकरींचे मालक पोटॅशियम ब्रोमेटचा वापर करीत होते, त्यांनी हे रसायन वापरणे बंद केले आहे. त्यामुळे देशात तयार केला जाणारा ब्रेड हा सुरक्षित असल्याचा दावा मागो यांनी केला.

मुंबईतला पाव सुरक्षित
एकटय़ा मुंबईमध्ये १२ लाख स्लाइस ब्रेडची पाकिटे दररोज खपतात. यामध्ये ‘ब्रिटानिया’, ‘क्वालिटी’, ‘मॉडर्न’, ‘शेल्डन’, ‘जेके’, ‘बिम्बो’ या कंपनींच्या पावाचा समावेश आहे. या कंपन्यांव्यतिरिक्त २००० असंघटित पाव उत्पादक (बेकरी) मुंबईत कार्यरत आहेत. मुंबईत दहा वर्षांपासून ब्रेड तयार करताना पोटॅशियम ब्रोमेटचा वापर केला जात नाही. त्यामुळे इथला पाव सुरक्षित आहे, असा दावा ‘इंडिया बेकर्स असोसिएशन’चे अध्यक्ष के.पी.इराणी यांनी केला. आमच्याकडील पाव रुग्णालये आणि इतर सेवा संस्थांना पुरविला जातो. मात्र माध्यमांमधील चर्चामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, असेही इराणींनी सांगितले.

फक्त पाव खाणे हानीकारकच
पावामधील मैद्याचा शरीरावर वाईट परिणाम होते. काबरेहायड्रेट्स, ग्लुकोजच्या अतिप्रमाणामुळे शरीराला याचे घातक परिणाम होतात. मात्र देशामध्ये पाव खाणाऱ्यांची संख्या अधिक असून तो खाणे थांबविणे अशक्य आहे. यावर उपाय म्हणून फक्त पाव खाण्याऐवजी त्यासोबत प्रोटिनयुक्त पदार्थ खावेत. मात्र पर्यायी सांगितल्या जाणाऱ्या ‘ब्राउन ब्रेड’मध्ये तथ्य नसून यातून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. या ब्रेडच्या आवरणावर गव्हाचे प्रमाण दिले जात नसल्याचा आरोप आहारतज्ज्ञ डॉ. रत्नाराजे थार यांनी केला आहे.