वाहतूक पोलिसांच्या सेवेत ५० अत्याधुनिक ब्रेथ अनलायझर

सण उत्सवांच्या काळात मद्य प्राशन करुन पादचाऱ्यांबरोबरच इतर वाहनांमधील प्रवाशांच्याही जीवाशी खेळणाऱ्यांना वठणीवर आणण्याकरिता सीसी टीव्ही कॅमेरांबरोबरच अत्याधुनिक ब्रेथ अनलायझरच्या मदतीने आता वाहतूक पोलिस आणखी सुसज्ज होणार आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल ५० अत्याधुनिक ब्रेथ अनालायझर येत्या दोन दिवसात वाहतुक पोलिसांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या यंत्राच्या माध्यमातून दारू पिऊन गाडी हाकणाऱ्या वाहनचालकाचा चेहराच थेट टिपता येणार आहे.

ब्रेथ अनालायझर पुरेसे नसल्याने तळीरामांना अटकाव करण्याच्या मोहीमेला मर्यादा येत होत्या. त्यात ही यंत्रेही कालबाह्य़ झाली होती.

त्यामुळे अनेक तळीराम पोलिसांच्या कारवाईतून सुटत होते. मात्र येत्या दोन दिवसांत या तळीरामांना रोखण्यासाठी मुंबई पोलीसांच्या ताफ्यात अत्याधुनिक ब्रेथ अनालायझर येणार आहेत.

सध्या मुंबई पोलिसांकडे ९४ ब्रेथ अनालायझर आहेत. त्यांच्यात आता ४ नोव्हेंबरपासून ४९ यंत्रांची भर पडणार आहे, असे मुंबई वाहतूक पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले. ख्रिसमस, नववर्षांची पूर्वसंध्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या काळात मोठय़ा प्रमाणात तळीराम मोकाट सुटलेले असतात. त्यांना आळा घालण्याकरिता पोलिसांच्या करडय़ा नजरेबरोबरच या यंत्रांचीही मदत होणार आहे.

चाचणी सुरू

सध्या प्रायोगिक तत्त्वावर वरळी, वांद्रे, सांताक्रूझ, विक्रोळी याठिकाणी यापैकी सात अत्याधुनिक ब्रेथ अनालायझरची चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे नवे ४९ ब्रेथ अनालायझर वाहतूक पोलिसांच्या सेवेत येणार आहेत.

ब्रेथ अनलायझर कसे असेल?

ही अत्याधुनिक ‘ब्रेथ अनालायझर’ यंत्रणा जीपीएस प्रणालीवर चालणार आहे. या नव्या यंत्रांवर एक कॅमेरा असेल. त्याद्वारे संबंधित व्यक्तिचे छायाचित्र टिपता येणार आहे. ‘सेलफोन’प्रमाणे ही प्रणालीही बॅटरीवर चालेल. तसेच याला ‘टच स्क्रीन’ व प्रिंटची सेवाही उपलब्ध आहे. एका ब्रेथ अनालायझरमध्ये तब्बल ५०,००० व्यक्तिंची माहिती साठवता येऊ शकते. एखाद्या तळीरामाला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्या वाहन परवान्याची माहिती घेतल्यानंतर त्या व्यक्तिची संपूर्ण माहिती त्याद्वारे पोलीस कंट्रोल रुमला जाणार आहे. तसेच हे उपकरण संगणकाला युएसबीच्या साहाय्याने जोडता येऊ शकेल. त्यामुळे ही माहिती संगणकातही साठविता येणार आहे.