News Flash

१५० रुपयांची लाच.. १७ वर्षांनी निर्दोष मुक्तता..!

या प्रकरणातील मूळ तक्रारदार महिलेला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिना १०० रुपये मिळायचे.

बीडमधील लाच प्रकरण

दीडशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याचा आरोपातून बीडच्या तहसीलदार कार्यालयातील कारकून आणि शिपायाची उच्च न्यायालयाने तब्बल १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली.
न्यायमूर्ती एम. टी. जोशी यांनी गणेश गाडे आणि सय्यद खाजा अशा दोघांना अनुक्रमे दोन वर्षे व एक वर्ष शिक्षा सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला. या प्रकरणातील मूळ तक्रारदार महिलेला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिना १०० रुपये मिळायचे. ही रक्कम पोस्टाने त्यांना मिळायची; परंतु जुलै १९९८च्या आधी त्यांना ही रक्कम येणे अचानक बंद झाले. त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी तहसीलदार कार्यालय गाठले. तेथे गाडे यांनी थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी ३०० रुपये देण्याची मागणी तक्रारदार महिलेकडे केली. तिने १५० रुपये देण्याचे मान्य करत ही रक्कम ३ ऑगस्ट १९९८ रोजी गाडे यांच्या कार्यालयात नेऊन दिली; परंतु लाचेची रक्कम देण्याचे मान्य करतानाच या महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या दोघांविरोधात तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडे व सय्यद यांना अटक केली, असा पोलिसाचा दावा होता. पोलिसांनी या दाव्याच्या समर्थनार्थ उभ्या केलेल्या साक्षीदारांची साक्ष मान्य करत कनिष्ठ न्यायालयाने २००१ मध्ये गाडे व सय्यद यांना लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी दोषी ठरवले व अनुक्रमे दोन व एक वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेला दोघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
परंतु प्रकरणाचे तपास अधिकारी, पंच, साक्षीदार आणि तक्रारदार महिला हे सगळे एकाच परिसरात राहतात आणि आम्हाला गोवण्यासाठी तक्रारदार महिलेचा वापर करून घेण्यात आल्याचा आरोप आरोपींनी अपिलावरील युक्तिवादाच्या वेळेस केला. एवढेच नव्हे, तर ज्या महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात कसे जायचे हे माहीत नाही ती महिला स्वत:हून तक्रार कशी काय नोंदवू शकते, ही बाबही आरोपींनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. शिवाय तिची मुले कमावती झाल्याने तिला या योजनेचा लाभ मिळू शकणार नसल्याची माहितीही गाडे याने तिला दिली होती हेही न्यायालयाच्या समोर आणण्यात आले. पोलिसांकडून या बचावाला तीव्र विरोध करण्यात आला. मात्र न्यायालयाने तो मान्य करत दोघांची निर्दोष सुटका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 4:45 am

Web Title: bribe of rs 150 after 17 years acquitted
Next Stories
1 दूषित पाण्यामुळे बालकाचा मृत्यू
2 शाहरूखची चौकशी
3 दिवाळीच्या पहिल्या दिवशीच मध्य रेल्वे रखडली ; ठाणे-कळवा दरम्यान तीन म्हशींना उडवले
Just Now!
X