तीन पुलांचे काम अंतिम टप्प्यात; अनेक अडथळ्यांमुळे काम पूर्ण होण्यास विलंब

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील तीन पूल तातडीने उभे करण्याची जबाबदारी लष्कराकडे सोपविण्यात आली होती. आंबिवली, एल्फिन्स्टन रोड आणि परळ स्थानकाला जोडणाऱ्या पुलाबरोबरच करी रोड स्थानकातील पादचारी पुलांचा यात समावेश होता. यातील आंबिवली स्थानकातील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर अनेक अडथळ्यानंतर एल्फिन्स्टन रोड, करी रोड स्थानकातील पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी पंधरा दिवस लागतील आणि त्यानंतर ते सुरू केले जातील, अशी माहिती बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप आणि सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर धीरज मोहन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

एल्फिन्स्टन आणि परळ जोडपुलासाठी दुसरा गर्डर टाकण्याचे काम शनिवारी करण्यात आले. या तीनही पुलांसाठी असलेले गर्डर आणि अन्य साहित्य हे खास भारत-चीन सीमेजवळील डोकलामहून येथून आणण्यात आले आहेत.

तीनही पूल ३१ जानेवारी २०१८ पर्यंत पूर्णत्वास येतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. परंतु अनेक अडथळ्यांमुळे पुलांचे काम पूर्ण होण्यास वेळ लागला. पुलांचे नियोजन, त्यांचे आरेखन आणि त्यानंतर प्रत्यक्षात बांधकाम अशी योजना लष्कराकडून आखण्यात आली होती. मात्र रेल्वे आणि लष्कर यांना एकमेकांच्या कामाची पद्धत समजून घेण्यातच वेळ गेल्याचे सांगून धीरज मोहन म्हणाले, परळ आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकातील जोड पुलाच्या आरेखनासाठीच तीन आठवडय़ांचा कालावधी लागला.

करी रोड स्थानकातील पुलासाठी लागणारी खासगी जागाही रेल्वेला मिळण्यास बराच विलंब झाला. तसेच उपनगरी सेवेत कोणताही अडथळा येऊ न देता पुलांचे काम करणे अवघड होते आणि दोन्ही पुलांचे काम पूर्ण होण्यास वेळ लागला.

परळ आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकातील जोड पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून करी रोड स्थानकातील पुलाचे काम ६० टक्के झाले आहे. आंबिवली स्थानकातील पुलाचे काम पूर्ण झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पुलावरून वाहनेही जाण्याची क्षमता

परळ आणि एल्फिन्स्टन रोड स्थानक जोड पुलाचा दुसरा गर्डर टाकण्याचे काम शनिवारी दुपारी करण्यात आले, तर तिसरा गर्डर टाकण्याचे काम शनिवारी मध्यरात्री करण्यात येणार आहे. हे गर्डर टाकण्यासाठी ३५० टनाची क्रेन वापरण्यात आली. २४० फूट लांबीच्या आणि १२ मीटर रुंदीच्या पुलावरून लष्कराचे टँकर्स वगळता अन्य कोणतीही वाहने जाऊ शकतात. यासह अन्य दोन पुलांची कालमर्यादा ५० ते ६० वर्षांची आहे.

१३ कोटींचा खर्च

* करी रोड स्थानकातील पुलाच्या महत्त्वाच्या कामांसाठी ४ फ्रेबुवारी रोजी मध्य रेल्वेकडून सहा ते आठ तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या पुलाचा पूर्वेकडे उतार देण्यात येत असून येथील जागा एका खासगी मालकीची होती. ती जागा मिळविण्यासाठी पाच कोटी रुपये मोजावे लागले.

* आंबिवली रेल्वे स्थानकातील पूल जानेवारी अखेरीस प्रवाशांसाठी सुरू करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

* आंबिवली, परळ आणि एल्फिन्स्टन जोड पूल, करी रोड स्थानकातील पुलांच्या कामांसाठी एकूण १३ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.