पालिकेने स्थापन केलेल्या समितीतील वास्तू विशारदांचे आयुक्तांना पत्र

मुंबई : शहरातील धोकादायक पुलांच्या दुरुस्ती वा पाडकामाबाबत मुंबई महापालिकेकडून परस्परविरोधी भूमिका घेतल्या जात असल्याचे मुंबईतील वास्तू विशारद, अभियंत्यांचे म्हणणे आहे. या सगळ्यांनी एकत्र येत आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने सर्वेक्षण करून काही पूल धोकादायक ठरविले. याबाबत पालिकेने व्हीजेटीआयच्या अभियंत्यांची मदत घेतली. तसेच काही तज्ज्ञ अभियंत्यांची तांत्रिक सल्लागार समितीही तयार केली. मात्र या दोन्ही अभियंत्यांच्या पॅनलने दिलेल्या सल्ल्यात तफावती असल्याने वाद निर्माण झाला आहे. सांताक्रूझ येथील जुहू पुलावर काँक्रीटचा स्लॅब घालण्याची गरज नसताना तो घातला जात असल्याचा आरोप या समितीने केला आहे.

हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिकेने पुलांचे पुन्हा सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात २९ पूल धोकादायक आढळून आले होते. त्यापैकी काही पादचारी पूल पाडून टाकले तर काही अंधेरी घाटकोपर लिंक रोडवरी लक्ष्मीबाग नाला पूल आणि जुहू तारा पूल १९ पूल बंद करण्यात आले होते. महत्त्वाचे पूल बंद केल्यामुळे त्या त्या विभागात खूप वाहतूक कोंडी होऊ  लागली होती. त्यामुळे हे पूल हलक्या वाहनांसाठी तरी सुरू ठेवावे यासाठी लोकांमधून दबाव वाढू लागला होता. त्यानंतर पालिकेने महत्त्वाच्या पुलांची चाचणी घेऊन हे पूल हलक्या वाहनांसाठी सुरू करता येतील का याची चाचपणी सुरू होती. एसएनडीटी नाल्यावरील जुहू तारा मार्गावरील पूलही धोकादायक आढळला होता. या पुलाच्याबाबत निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्लय़ानुसार या पुलाची संरचनात्मक तपासणी पालिकेने केली होती. तर दुसऱ्या बाजूला पालिकेने तज्ज्ञ नागरिकांची तांत्रिक सल्लागार समिती स्थापन केली होती. या दोन सल्लागारांच्या मतांमध्ये तफावत आहे.

जुहू तारा पूल हा बऱ्या स्थितीत असून तो हलक्या वाहनांसाठी खुला करता येईल, अशी सूचना नागरिकांच्या समितीने केली होती. मात्र व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांनी या पुलाच्या मजबुतीकरणाचा सल्ला दिला होता. तो सल्ला ऐकून पालिकेने जुहू तारा पुलावर सिमेंट काँक्रीटचे स्लॅब चढवण्याचे ठरवले आहे. त्यावर नागरिकांच्या समितीने आक्षेप घेतला असून या समितीमधील वास्तुविशारद शिरीष पटेल यांनी याबाबत पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना पत्र लिहिले आहे. पालिका करीत असलेले काम चुकीचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सिमेंट काँक्रीटचे थर चढवल्यामुळे या पुलाचे वजन वाढेल असा दावा पटेल यांनी केला आहे.

पुलाची जबाबदारी घेणार का?

काम चुकीच्या पद्धतीने चाललेले असल्याची बाब मुख्य अभियंता संजय दराडे यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे. त्यावर पुलाची जबाबदारी तुम्ही घेणार का असा सवाल दराडे यांनी आपल्याला केला. तेव्हा आपण ही जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे दराडे यांना सांगितले, असे पटेल यांचे म्हणणे आहे. हा पूल ७ जुलैपर्यंत लहान वाहनांसाठी खुला करता आला असता, असा पटेल यांचा दावा आहे.