बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा पुढाकार

गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास टाळण्यासाठी आणि विसर्जनसमयी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने गणेशमूर्तीवर उंचीची मर्यादा घालण्याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. गणेशमूर्तीची उंची मर्यादित असावी यादृष्टीने आतापासून गणेश मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे. त्याचबरोबर गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मातीपासूनच गणेशमूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्नही करण्यात येणार आहेत.

मुंबईमधील गिरगाव, खेतवाडी, लालबाग, परळ, दादर यांसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाची उंच मूर्ती साकारण्याबाबत चढाओढ लागली आहे. परंतु विसर्जनाच्या वेळी उंच गणेशमूर्ती विसर्जनस्थळापर्यंत घेऊन जाणे जिकिरीचे बनते. विसर्जन सोहळ्यादरम्यान मोठय़ा गणेशमूर्ती, भाविकांची गर्दी यामुळे मुंबईतील अनेक भागांमधील वाहतुकीला फटका बसत आहे. त्याशिवाय बहुतांश मोठय़ा गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून साकारण्यात येतात. या मूर्ती समुद्रात विरघळत नाहीत. त्यामुळे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी प्लास्टर ऑफ पॅरिसचे मोठाले तुकडे समुद्राच्या काठावर अस्ताव्यस्त पडलेले असतात. प्लास्टर ऑफ पॅरिस आणि  रंगांमुळे समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण होतो.

या सर्व समस्यावर उपाय म्हणून गणपतीची मूर्ती १८ फुटांपेक्षा उंच नसावी, असा निर्णय समन्वय समितीने काही वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानंतर मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तसे आवाहनही करण्यात आले होते. परंतु याकडे मूर्तिकार आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नव्हते. काही वर्षांपूर्वी गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीत गणेशाची उंच मूर्ती कोसळली होती, तर दुसऱ्या एका घटनेत गिरगाव चौपाटीवर वाळूमध्ये ट्रॉलीचे चाक तुटून गणेशमूर्ती दोन तरुणांच्या अंगावर पडली होती, लालबाग येथे उंच गणेशमूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात असताना त्यावर कमान पडली होती. भविष्यात असे प्रकार घडून गणेशाची विटंबना होऊ नये म्हणून समन्वय समितीने गणेशमूर्तीवर उंचीची मर्यादा घालण्याची चळवळ पुन्हा एकदा हाती घेतली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टळावा, गणेशाची विटंबना होऊ नये आणि गणेशोत्सवाला अनुचित प्रकाराचे गालबोट लागू नये म्हणून समन्वय समितीने आतापासूनच गणेश मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सव गुण्यागोविंदाने पार पडावा. गणेशमूर्तीचा अवमान होऊ नये आणि पर्यावरणाचा ऱ्हास टळावा, गणेशोत्सवाला शिस्त लागावी या दृष्टीने गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे आतापासूनच ही चळवळ हाती घेण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे. राज्य सरकार आणि पालिकेनेही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

– अ‍ॅड्. नरेश दहिबावकर,

अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती