देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून लौकीक असलेल्या मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मालमत्ता कराची चोरी करणाऱ्यांवर अंकुश बसविण्यासाठी योजना आखली आहे. जो कोणी मालमत्ता कर देण्यास टाळाटाळ करेल अथवा कराचा वेळेत भरणा करणार नाही, अशा करचुकव्यांच्या घरातील किंमती सामानावर जप्ती आणण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. यात घरातील कॉम्प्युटर, फर्निचर, टीव्ही, फ्रिज, एसी, सोफा आणि अन्य सामानाचा समावेश आहे. दरवर्षी मे महिन्यात एक यादी प्रसिद्ध करण्यात येते. कोणी किती मालमत्ता कर भरावयाचा आहे याबाबतची माहिती या यादीमध्ये देण्यात आलेली असते. हा मालमत्ता कर दोन टप्प्यात भरावयाचा असतो. यातील पन्नास टक्के हिस्सा ऑगस्टमध्ये आणि उर्वरित अर्धा हिस्सा डिसेंबरमध्ये द्यावयाचा असतो. परंतु, अनेकजण वेळेत टॅक्स भरत नसल्याचे याबाबतची अधिक माहिती देताना मंगळवारी बीएमसीकडून सांगण्यात आले.
कोर्टाच्या निर्णयामुळे नवीन योजना – मालमत्ता कर चुकवणाऱ्यांवर आत्तापर्यंत बीएमसीकडून मोठा दंड आकारला जात होता. अलीकडेच एका प्रकरणादरम्यान निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला असे करण्यास मनाई केली. त्यामुळे बीएमसीने हा नवीन मार्ग अवलंबविण्याचे ठरवले. याअंतर्गत मलामत्ता कर न भरल्यास महापालिका पाण्याचे कनेक्शनदेखील कापू शकते. मालमत्ता कर भरायची शेवटची तारीख निघून गेल्यावर तीन आठवड्यांच्या मुदतीनंतरच महापालिकेकडून हे पाऊल उचलण्यात येईल. बीएमसीच्या या निर्णयाचे एक पत्रकदेखील मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी प्रसिध्द केले आहे. जर परिस्थिती अधिकच गंभीर झाली तर मालमत्ता कर चुकविणाऱ्याच्या प्रॉपर्टीचा लिलावदेखील करण्यात येईल, अशी माहिती अजय मेहता यांनी दिली. मालमत्ता कराची चुकवेगिरी करणाऱ्यांमुळे बीएमसी हैराण असून, कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर येणे बाकी आहे.