आतापर्यंत २,२३८ कोटी खर्च ; ५८ पैकी २८ कामे पूर्ण

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : पावसाळ्यात सखलभागात पाणी साठू नये यासाठी २७ वर्षांपूर्वी तयार केलेल्या ब्रिमस्टोवॅड प्रकल्पातील कामे मुंबई महापालिकेला पूर्ण करता आलेली नाही. आतापर्यंत या प्रकल्पातील ५८ पैकी २८ कामे पालिकेने पूर्ण झाली आहेत. सुमारे २७ कामे प्रगतीपथवर, तर तीन कामे निविदा प्रक्रियेत

आहेत.

या कामांसाठी  २,२३८ कोटी रुपये खर्च झाले असून आणखी २,७०० कोटी रुपयांची गरज गरज असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. परिणामी, या प्रकल्पाचा खर्च ४,९३८ कोटी रुपयांवर पोहोचण्याची चिन्हे आहेत.

मुंबईमध्ये १९८५ मुसळधार पाऊस पडला आणि मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अभ्यास करण्याचा निर्णय घेत या कामासाठी १९८९ मध्ये एका कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक केली. या कंपनीने मुंबईतील १२१ सखलभागांचा अभ्यास केला. त्यानंतर १९९३ मध्ये बृहत आराखडा तयार केला. हाच तो आराखडा ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्प.

मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे २६ जुलै २००५ मध्ये पुन्हा हाहाकार उडाला आणि पूरस्थितीवर उपाययोजना सुचविण्यासाठी सत्यशोधक समितीची स्थापना करण्यात आली. सत्यशोधक समितीने ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पातील कामे हाती घेण्याची शिफारस केली. त्यानंतर प्रकल्पात सुधारणा करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी २०१८ मध्ये पुन्हा ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पाचा आराखडा सादर केला. त्यात पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्याची शिफारस या करण्यात आली होती. मुख्यत्वे भूमिगत नाले, गटारे, पेटिका नाल्यांची दुरुस्ती, सिमेंट काँक्रिटच्या नव्या पर्जन्य जलवाहिन्या बांधणे, नाल्यांचे पुनर्बाधकाम, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, नाल्यालगत सेवा रस्त्यांचे बांधकाम, पर्जन्य जलउदंचन केंद्र उभारणे या कामांचा समावेश होता. एकूण ५८ कामे या प्रकल्पाअंतर्गत करण्याचे निश्चित करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २० तर दुसऱ्या टप्प्यात ३८ कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यातील १६ कामे पूर्ण झाली असून उर्वरित चार कामे सुरूच आहेत. दुसऱ्या टप्प्यातील ३८ पैकी १२ कामे पूर्ण झाली असून २३ कामे प्रगतीपथावर असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. तर तीन कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुळ ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्प तयार केल्यानंतर तो पालिका दरबारी धुळ खात पडला होता.आता त्यावरील खर्चाचा डोंगर वाढत आहेत.