कुटुंबीयांना बोलावण्याच्या न्यायालयाच्या सूचनेमुळे आरोपींची भंबेरी; जामिनाची रक्कम बालकाश्रमाला दान करण्याचे आदेश

मुंबई : बेकायदा डान्सबारवरील कारवाईत अटक केलेल्या ४७ आरोपींची रविवारी दंडाधिकारी न्यायालयाने भंबेरी उडविली. आरोपींच्या कुटुंबाला न्यायालयात आणा. ते रात्री कुठे असतात, काय करतात, हे त्यांच्या कुटुंबीयांनाही कळू द्या.. अशा सूचना दंडाधिकाऱ्यांनी दिल्या. मात्र अखेर त्यांनी आरोपींच्या जामिनाची रक्कम बालकाश्रमाला दान करण्याचे आदेश देत सर्वाना जामीन मंजूर केला.

गुन्हे शाखेच्या कक्ष-२ ने शनिवारी मध्यरात्री ताडदेव येथील ‘इंडियाना’ बारवर छापा घातला. पूर्वी या बारचे परवाने ‘परफॉर्मिग डान्स बार असोसिएशन’चे अध्यक्ष भरत ठाकूर यांच्या नावे होते. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली येथे बारबाला नृत्य, अंगविक्षेप करतात अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. छापा घातल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. या कारवाईत ४७ जणांना अटक करण्यात आली. त्यात ग्राहक, बारमधील कामगार, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आठ बारबालांना नोटीस बजावून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात येण्यास सांगण्यात आले.

रविवारी ४७ आरोपींना दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या युक्तिवादात ‘इंडियाना’ बारकडे नृत्याचा परवाना नाही, अन्य परवान्यांची मुदत संपुष्टात आली आहे, अशी माहिती पुढे आली. तसेच कारवाई करण्यात आलेल्या बारबालांचे कृत्य, ग्राहकांकडून होणारी पैशांची उधळण याविषयीही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. हे तपशील ऐकून न्यायालयाने ४७ आरोपींच्या माता-भगिनी, पत्नीला न्यायालयात बोलावण्याची सूचना पोलिसांना केली. त्यांना आपला पती, भाऊ, मुलगा रात्री कुठे असतो, काय करतो, बारबालांवर किती पैसे उधळतो हे समजू शकेल. संसाराठी खर्च करण्याऐवजी आरोपींनी ती रक्कम बारबालांवर उधळली, हेही त्यांच्या कुटुंबाला समजणे आवश्यक आहे. पुन्हा असा गुन्हा करणार नाही, अशी हमी प्रतिज्ञापत्रावर द्यावी, अशीही सूचना दंडाधिकाऱ्यांनी केली. यासाठी रात्री आठ वाजेपर्यंत कामकाज सुरू ठेवण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यावर बचावपक्षाच्या वकिलांनी सारवासारव केली. आरोपी मुंबई, महाराष्ट्राबाहेरचे आहेत. कुटुंबांना हजर करणे अशक्य आहे. कुटुंबाला हे समजल्यास घटस्फोट होऊ शकतो, बहिष्कृत केले जाऊ शकते. त्याऐवजी त्यांना एक संधी द्यावी, अशी विनंती वकिलांपर्फे करण्यात आली.

जामीन सत्कारणी

* पुढील सुनावणीत या आरोपींच्या जामिनाची रक्कम सत्कार्णी लावावी, अशी सूचना दंडाधिकाऱ्यांनी केली. त्यावर भारतीय लष्कर, अनाथ मुलांसह विविध सामाजिक विषयांवर भरीव कामगिरी करणाऱ्या संस्थांना ही रक्कम दान देण्याचे पर्याय पुढे आले. त्यावर दंडाधिकाऱ्यांनी ही रक्कम बदलापूर येथील सत्कर्म बालकाश्रमाला दान करावी, त्याची पावती न्यायालयात सादर करावी, असे आदेश दिले.

* या प्रकरणाचा पुढील तपास आणि कार्यवाही ताडदेव पोलीस करणार आहेत. न्यायालयाच्या आदेशांनुसार ४७ आरोपींकडून प्रत्येकी तीन हजार रुपये बालकाश्रमाला दान केले जाणार असल्याचे ताडदेव पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.