News Flash

अमली पदार्थविक्री प्रकरणी ब्रिटिश नागरिकाला अटक

सजनानीच्या चौकशीतून राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाहिस्ता यांची नावे समोर आली

संग्रहित प्रतिनिधिक

मुंबई : मुंबईसह देशभरातील उच्चभ्रू व्यक्तींना परदेशी गांजा (कुश, क्युरेटेड मॅरीऑना) पुरवणाऱ्या भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकाला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) खार येथून अटक केली.

करण सजनानी असे आरोपीचे नाव असून त्याला मदत करणाऱ्या मुंबईतील दोन तरुणींनाही एनसीबीने अटक केली आहे. सजनानीने मुंबई, महाराष्ट्रासह गोवा, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि मेघालयमध्ये मोठय़ा प्रमाणावर परदेशी गांजा पुरविल्याची माहिती पुढे आली आहे.

एनसीबीने सजनानीच्या खार येथील घरी छापा घालून सुमारे २०० किलो गांजा आणि प्रतिबंधीत सीबीडी स्प्रे जप्त केला. यापैकी काही भाग अमेरिकेहून तस्करी करत भारतात आणण्यात आला होता. तर काही भाग उत्तरप्रदेश येथून आणण्यात आला होता.

ब्रिटनहून दीड वर्षांपूर्वी भारतात आलेला सजनानी हा सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातही संशयीत आहे. त्याच्या ग्राहकांची चौकशी केली जाईल, असे एनसीबी अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सजनानीच्या चौकशीतून राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाहिस्ता यांची नावे समोर आली. राहिला ही सजनानीला अर्थसहाय्य करण्यासह अमली पदार्थाची आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक करण्यासाठी सहकार्य करत होती. तर शाहिस्ता अमली पदार्थाचे सेवन करत होती, असा दावा एनसीबीने केला. राहिला ही काही वर्षांपूर्वी अभिनेत्री दिया मिर्झाकडे व्यवस्थापक म्हणून काम करत होती, असेही समोर आले आहे.

अर्जुन रामपालच्या बहिणीला समन्स

अभिनेता अर्जुन रामपालची बहीण कोमल हिला एनसीबीने समन्स पाठवून सोमवारी चौकशीस बोलावले आहे. याआधीही तिला चौकशीस बोलावले होते. मात्र ती गैरहजर राहिली. एनसीबीने अर्जुन आणि त्याची प्रेयसी गॅब्रीएला डेमॅट्रीएड्स यांच्या निवासस्थानी छापा घालून प्रतिबंधित औषधांचा अंश जप्त केला होता. याप्रकरणी अर्जुन आणि गॅब्रीएला यांची एनसीबीने चौकशीही केली होती. याच प्रकरणात कोमलची चौकशी करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 1:37 am

Web Title: british citizen arrested in drug trafficking case zws 70
Next Stories
1 पालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी २० कोटींच्या मुखपट्टय़ांची खरेदी
2 ‘फास्टॅग’धारक वाहनचालकांना पथकरात पाच टक्के सवलत
3 खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षेची तपासणी
Just Now!
X