आग विझवण्यासाठी उभारलेल्या भूमिगत टाक्यांचा उलगडा; मुंबई शहरात ६५ टाक्या असल्याचा अंदाज

राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनातील तळघराचा शोध ताजा असतानाच ब्रिटिशांच्या दूरदृष्टी आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा आणखी एक पुरावा उजेडात आला आहे. मुंबई शहरात कोठेही लागलेली आग विझवण्यासाठी जवळपास पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ब्रिटिशांनी या शहराचा विकास करताना लाखो लिटर जलक्षमता असलेल्या पाण्याच्या भूमिगत टाक्या बांधल्या होत्या. आजघडीला या टाक्या पालिकेच्या जल विभागाच्या ताब्यात असून त्या पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. परिणामी, या टाक्यांची वाताहत होऊ लागली आहे. मात्र भविष्यात या टाक्यांची डागडुजी करून अग्निशमन तसेच अन्य कारणांसाठी त्या वापरात आणता येतील का, याचा आता अभ्यास सुरू झाला आहे. ब्रिटिशांनी मुंबईत ६५हून अधिक भूमिगत टाक्या उभारल्याचे सांगण्यात येत आहे.

काळा घोडा परिसरातील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाच्या संकुलात दहा मीटर बाय दहा मीटर लांबी, रुंदीची आणि तीन मीटर खोल भूमिगत पाण्याची टाकी असल्याची बाब संग्रहालय प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. या टाकीची २.५० लाख लिटर पाणी सामावून घेण्याची क्षमता आहे. सध्या ही टाकी वापरात नाही. मात्र अधूनमधून पालिकेच्या जल विभागातील कर्मचारी टँकरमधून पाणी आणून या टाकीमध्ये सोडत असल्याने संग्रहालयाचे संचालक  सब्यसची  मुखर्जी यांना कुतूहल निर्माण झाले. संग्रहालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यांनी या टाकीविषयी शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक आणि सेंट झेविअर्स महाविद्यालयातील प्राध्यापक अवकाश जाधव यांच्याशी चर्चा केली. मुखर्जी आणि जाधव यांनी ‘ए’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पालिका अधिकाऱ्यांनी संग्रहालयातील टाकीची पाहणी केली.

त्यानंतर दिघावकर यांनी काही सेवानिवृत्त पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, अशा आणखी टाक्या मुंबईत उभारण्यात आल्याचे समोर आले. ब्रिटिश काळात इमारतींना लागलेली आग विझविण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी पाण्याच्या भूमिगत टाक्या बांधण्यात आल्या होत्या. अशा ६५ टाक्या मुंबईत असल्याचा अंदाज आहे. कुलाबा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात पोलीस मुख्यालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्, छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय आणि कुलाब्यातील नौदल परिसरात सात टाक्या आढळल्या आहेत. अन्य टाक्यांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

वस्तुसंग्रहालयाच्या संकुलातील टाकीमध्ये टँकरमधून पाणी सोडून जलपातळी राखण्याचे काम केले जाते. मात्र या टाकीतील पाण्याचा वापर होत नाही. टाकीत सोडलेल्या पाण्याची पातळी काही दिवसांमध्ये खालावत असल्याचे निदर्शनास आले आहे. आसपासच्या झाडांच्या मुळांमुळे टाकीचे नुकसान झाले असावे आणि त्यामुळे तिला गळती लागली असावी, असा अंदाज संग्रहालयातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. आता या टाकीजवळ एक फलक लावण्यात आला असून त्यावर टाकीविषयीची माहिती नमूद करण्यात आली आहे. फलकावर ‘ए-४’ असा उल्लेख करण्यात आला असून या परिसरातील ही चौथी टाकी असावी असा निष्कर्ष काढण्यात आला.

काही महिन्यांपूर्वी कुलाब्यातील ‘मेट्रो हाऊस’ला भीषण आग लागली होती. वाहतूक कोंडीत अडकलेले पाण्याचे टँकर वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकले नव्हते. छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयातील २.५० लाख लिटर क्षमतेची टाकी सुस्थितीत असती तर ‘मेट्रो हाऊस’ची आग विझविण्यासाठी वेळीच पाणी मिळाले असते आणि दुर्घटनाग्रस्त इमारतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले नसते. त्यामुळे या टाक्यांची दुरुस्ती करून त्या कार्यान्वित करणे गरजेचे आहे.

– प्रा. अवकाश जाधव, शिवसेना नगरसेवक

 

ब्रिटिश काळामध्ये अग्निशमनासाठी झटपट पाणी मिळावे म्हणून ही भूमिगत टाकी बांधण्यात आली होती. अशा आणखी किती टाक्या मुंबईत आहेत याचा शोध उपलब्ध नोंदींमधून घेण्यात येईल. या टाक्यांतील पाण्याचा अग्निशमनासाठी भविष्यात कसा वापर करता येईल याचा अभ्यास करण्यात येईल.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय