‘ट्राय’च्या वाहिन्या निवडीच्या नियमाचा परिणाम

दूरचित्रवाहिन्यांची प्रेक्षकप्रियता ठरवणारी ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल ऑफ इंडिया’ (बार्क) ही संस्था पुढील आठवडय़ापासून सशुल्क आणि नि:शुल्क वाहिन्यांच्या ‘टीआरपी’ची आकडेवारी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे सशुल्क वाहिन्या जास्त पाहिल्या जातात की नि:शुल्क, हे स्पष्ट होईल.

‘टीआरपी’च्या आकडेवारीनुसार दूरचित्रवाहिन्यांचे चित्र दर आठवडय़ाला बदलत असते. परंतु भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा (ट्राय)च्या नव्या नियमानुसार १ फेब्रुवारीपासून वाहिन्या निवडीचा हक्क प्रेक्षकांना मिळाला. त्यानंतर ‘टीआरपी’साठी दूरचित्रवाणीवरील सशुल्क वाहिन्या आणि नि:शुल्क वाहिन्या अशी तगडी स्पर्धा निर्माण झाली होती. त्यामध्ये १ फेब्रुवारीनंतर सातत्याने नि:शुल्क वाहिन्या ‘टीआरपी’मध्ये प्रथम क्रमांक मिळवत होत्या आणि स्टार, झी, सोनी, कलर्स या समूहांच्या लोकप्रिय सशुल्क वाहिन्यांचे स्थान घसरत चालले होते.  वाहिन्या निवडीचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्राहकांनी नि:शुल्क वाहिन्या पाहण्यास प्राधान्य दिले. परिणामी सशुल्क वाहिन्या पाहणाऱ्यांची संख्या घसरू लागली. तसेच ट्रायचा नवीन नियम अमलात आणताना निर्माण झालेल्या गोंधळाचा फटका सशुल्क वाहिन्यांना बसू लागला.

ग्रामीण भागांत नि:शुल्क वाहिन्या जास्त पाहिल्या जातात आणि शहरात सशुल्क वाहिन्या. त्याबाबतची आकडेवारी शहरी आणि ग्रामीण असे दोन विभाग करून ‘बार्क’ देत होती. परंतु ‘ट्राय’च्या नव्या नियमानंतर ‘टीआरपी’ आकडेवारीसाठी ग्रामीण आणि शहरी असे दोन विभाग तसेच ठेवून स्वतंत्र ‘टीआरपी’ आकडेवारी दिल्यावर कुठली वाहिनी जास्त पाहिली जाते, हे स्पष्ट होणार आहे.

स्पर्धेची तीव्रता वाढणार : सशुल्क आणि नि:शुल्क वाहिन्यांची ‘टीआरपी’ आकडेवारी स्वतंत्रपणे जाहीर करण्याचा निर्णय पुढील आठवडय़ापासूनच लागू होणार आहे. त्यामुळे सशुल्क वाहिन्या जास्त पाहिल्या जातात की नि:शुल्क वाहिन्या, हे स्पष्ट होईल. या निर्णयामुळे दोन्ही प्रकारच्या वाहिन्यांमधील प्रेक्षकसंख्या मिळवण्याची स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.