लग्नाला विरोध असतानाही बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या २५ वर्षीय तरुण सैफअली शराफत अली याची दोघा भावांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हत्या झाली आहे. मालवणी पोलिसांनी हत्येप्रकरणी आरोपी वसीम बदरुद्दीन आणि अजमल बदरुद्दीन यांना अटक केली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आरोपी वसीम बदरुद्दीन, अजमल बदरुद्दीन आणि मृतक सैफअली हे एकाच गावाचे रहिवासी आहेत. आरोपी हे कुटुंबासह मालवणीच्या कलेक्टर कंपाउंड येथे प्लॉट क्र. २१ मध्ये राहत होते. सैफअली याने आरोपींच्या बहिणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र आरोपी वसीम बदरुद्दीन आणि अजमल बदरुद्दीन यांचा लग्नाला विरोध होता.

बहिणीचे लग्नाचे वय नसल्याचे सैफअली याला आरोपीच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. मंगळवारी सकाळी सैफअली हा आरोपींच्या घरी आला होता. त्याचवेळी आरोपी वसीम बदरुद्दीन आणि अजमल बदरुद्दीन हे घरी आले. सैफअली याला पाहताच त्यांना राग अनावर झाला. यामधून वादावादी झाली आणि सैफअलीवर चाकूने वार करण्यात आले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला होता. मालवणी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी वसीम बदरुद्दीन आणि अजमल बदरुद्दीन याना अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजार करण्यात येणार असलायची माहिती पोलिसांनी दिली.