बॉम्बमधील खिळ्यांमुळे दुखापत, आज काही भारतीय मुंबईत परतणार
ब्रसेल्स विमानतळावर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात जखमी झालेल्या मुंबईच्या निधी चाफेकरांच्या घोटय़ावर गुरुवारी ब्रसेल्समधील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. स्फोटात वापरण्यात आलेल्या बॉम्बमधील खिळे त्यांच्या पायात खोल गेल्याने त्यांच्या घोटय़ाजवळील हाडांचे छोटे-छोटे तुकडे झाले असून त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच त्यांची त्वचा १५ टक्के भाजली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पॅरिस हल्ल्यातील अब्देसलाम याच्यासह पाच जणांना अटक झाल्यानंतर मंगळवारी दहशतवाद्यांनी ब्रसेल्स विमानतळ आणि मेट्रोत बॉम्बस्फोट घडवून आणले. यात ३५ जण ठार झाले असून २०० जण जखमी झाले. यातील जेट एअरवेज कंपनीत नोकरी करणाऱ्या दोन भारतीयांचा समावेश असून निधी चाफेकर आणि अमित मोटवानी अशी त्यांची नावे आहेत. सध्या या दोघांवर ब्रसेल्स शहरात वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर असून या दोघांचेही कुटुंबीय सध्या त्यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात आले.
या हल्ल्यानंतर ब्रसेल्स शहरात खोळंबून राहिलेल्या भारतीयांना विशेष विमानाने शुक्रवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास भारतात आणण्यात येणार आहे. यासाठी जेट एअरवेज कंपनीचे विमान वापरण्यात येणार आहे. यात ४० ते ५० जणांचा समावेश असल्याचे समजते.

स्फोटातील बॉम्बविषयी
दहशतवाद्यांनी स्फोटासाठी वापरलेल्या बॉम्बमध्ये खिळ्यांचा वापर केला होता. अशा प्रकारच्या हल्ल्यात बॉम्बमध्ये काच किंवा खिळे वापरले जातात. स्फोट होताच या खिळ्यांना गती येते आणि ते माणसांच्या शरीरात रुतून हाडांना दुखापत करू शकतात. अधिकाधिक लोकांना याचा फटका बसावा, यासाठी असे करण्यात येत असल्याचे जाणकार सांगतात.