एखाद्या खासदारकीसाठी रिपब्लिकन नेतृत्वाचा अटापिटा सुरू असतानाच, बहुजन समाज पक्षाने मात्र, मायावती यांचा भावी पंतप्रधान म्हणून महाराष्ट्रातील दलित समाजात प्रचार सुरू केला आहे. बसपच्या राज्यभरातील सभांमध्ये स्वाभिमानी राजकारणावर भर दिला जात असून रिपब्लिकन नेतृत्वाला शह देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक रणनीती व प्रचाराचा भाग म्हणून मुंबईत रविवारी बसपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी दिली. 
महाराष्ट्रात बसपला निवडणुकीत यश मिळत नसले तरी ‘एकला चलो रे’ पद्धतीने पक्षाची वाटचाल सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपशी युती केल्यामुळे आंबेडकरी समाजात नाराजी आहे. त्याचा फायदा घेण्याचा बसपचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक सभांमध्ये स्वाभिमानी राजकारणाचा मुद्दा मांडून, एखाद्या खासदारकीसाठी दुसऱ्या पक्षांच्या दावणीला रिपब्लिकन पक्षला बांधणाऱ्या रिपब्लिकन नेतृत्वाला शह देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
कोकणात १९३८ मध्ये झालेल्या खोती विरोधी व दलित परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, मला तुमच्यातील प्रधानमंत्री झालेला पाहायचा आहे. बाबासाहेबांचे हे घोषवाक्य बसपने प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवले आहे.
भाजपला नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे असे वाटते, काँग्रेसला राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे, मग मायावती या देशाच्या पंतप्रधान व्हाव्यात, असे दलितांना का वाटू नये, असा प्रचार केला जात आहे. मुंबईत रविवारी  एलफिन्स्टन येथील कामगार मैदानावर बसपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. विलास गरुड व राज्याचे प्रभारी खासदार वीरसिंग हे या वेळी मार्गदर्शन करणार आहेत.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत‘एकला चलो रे’!
लखनौ: मायावती यांनी लोकसभेची आगामी निवडणूक बसपा स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करून मायावती यांनी ‘एकला चलो रे’चे स्पष्ट संकेत दिले आहेत. आपला पक्ष बाहेरून अथवा प्रत्यक्ष सहभागी होऊन काँग्रेस अथवा भाजपशी युती करणार असल्याची चर्चा अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बसपाच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल करून पक्षाचे खच्चीकरण करण्यासाठी पद्धतशीरपणे कट रचला जात असल्याचा आरोपही मायावती यांनी केला. निवडणुकीत आपला पक्ष उत्तम यश प्राप्त करील आणि सामाजिक बदलाच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही मायावती म्हणाल्या.