प्रपंच करावा नेटकामूळच्या बोरिवली येथील शिंपोली लिंक रोड येथील रहिवासी असलेल्या अंकिता देव या सध्या पुण्यातील औंध परिसरात वास्तव्यास आहेत. दोन वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर त्या पुण्याला स्थलांतरित झाल्या. तेव्हापासून आपल्या दोन्ही मुलांचे त्या एकल पालकत्व निभावत आहेत. अंकिता या खासगी बँकेत नोकरीस आहेत. बोरिवलीतील घर भाडय़ाने दिले असल्याने तेथून मिळणारी रक्कम तसेच नोकरीतील वेतन असे एकूण ७.७५ लाख रुपये त्यांचे वार्षिक उत्पन्न आहे. हे उत्पन्न प्राप्तिकराच्या २० टक्के मर्यादेत येते. अंकिता यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. तसेच मासिक खर्च साधारणपणे २० ते २५ हजार रुपयांच्या घरात असल्याने त्या दरमहा मोठय़ा रकमेची बचत करतात. ही रक्कम भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी आणण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांच्याकडे सध्या चारचाकी वाहन असून ते आठ वर्षे जुने आहे. त्यामुळे नजीकच्या काळात बँकेकडून वाहन कर्ज घेऊन नवीन गाडी खरेदी करण्याचा त्यांचा मानस आहे.

अर्थसंकल्पाचा परिणाम

सेवाकर अध्र्या टक्क्याने वाढल्याने देव यांच्या मासिक घरखर्चात १० ते १५ टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे. याचा परिणाम त्यांच्या बचतीवर पडेल.  वैयक्तिक कररचनेत बदल केले नसल्याने अंकिता यांना चालू वर्षांइतकाच प्राप्तिकर भरावा लागेल.

अर्थमंत्र्यांनी पेट्रोल गाडय़ांवर एक टक्का तर डिझेल गाडय़ांवर २.५ टक्के उपकर प्रस्तावित केला असल्याने सर्व प्रकारच्या चार चाकी वाहनांच्या किमती वाढणार आहेत. तसेच वाहनविम्याचाही हप्ता वाढणार असल्याने नवीन वाहन घेणे २२ ते २५ हजारांनी महाग झाले आहे.

वार्षिक उत्पन्न ७.७५ लाख

दरमहा खर्च २०-२५ हजार