रस्ते, वीज, पाणी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करणारा, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि बळीराजाला बळ देणारा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले. २०१८ पर्यंत सर्व गावांना वीज, रस्ते, पीक विमा योजनेसाठी ५५०० कोटींची तरतूद, या सर्व बाबी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या आहेत. कृषी, ग्रामीण व पायाभूत सुविधांवर भर देणारा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे, असे ते म्हणाले. आज शेतकऱ्यांना सर्वाधिक गरज पाण्याची आहे. देशातील अपूर्ण असलेल्या ७९ मोठय़ा सिंचन प्रकल्पांपैकी २३ प्रकल्प पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सिंचनासाठी १७ हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाच लाख नव्या विहिरी व तलाव बांधण्याची तरतूद असलेला अर्थसंकल्प शेतीच्या शाश्वत विकासाची हमी देणारा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.