राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गुरुवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत थेट सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट सरकारच्या नैतिककेवरच बोट ठेवल्यामुळे अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उठून त्यासंदर्भात खुलासा करावा लागला आणि फडणवीसांची मागणी मान्य करावी लागली. आणि या सगळ्याला कारणीभूत ठरली ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी वाचून दाखवलेली देवेंद्र फडणवीसांवरच आरोप करणारी एक व्हायरल पोस्ट!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं झालं काय?

आज विधानसभेमध्ये जळगावच्या शासकीय वसतिगृहात झालेल्या प्रकारावर चर्चा झाली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ६ वरीष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे वसतिगृह प्रशासनाला क्लीनचिट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशाच एका प्रकरणाचा हवाला देण्यासाठी उस्मानाबादमध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख सभागृहात केला. “उस्मानाबादमध्ये हनुमान चौकात एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने सुसाईड नोटमध्ये केला आहे”, असं फडणवीसांनी म्हणताच नाना पटोलेंनी यावर एक व्हायरल पोस्ट वाचून दाखवली. “फडणवीसांबद्दलचीही एक पोस्ट व्हायरल होत आहे. देवेंद्र फडणवीसांनी एका तृतीयपंथीशी खोटे आश्वासन देऊन अनैतिक संबंध ठेवले असल्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे. अशा पोस्ट व्हायरल होत असतात”, असं नाना पटोले म्हणाले.

“राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर कारवाई का नाही?”

या मुद्द्यावरून सभागृहात भाजपा आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. “माझे मित्र नाना भाऊ यांचा मी आभारी आहे. त्यांनी चांगल्या भावनेतून त्या पोस्टविषयी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या चिंचवडमधल्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट लिहिली आहे. याची तक्रार देखील करण्यात आली आहे. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात काहीही लिहिलं तरी त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अशा पद्धतीने लिहितो आणि त्यावर कारवाई केली जात नाही. या सरकारमध्ये खरंच नैतिकता असेल, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे”, अशी मागणी फडणवीसांनी केली.

जळगाव वसतिगृह महिला शोषण प्रकरणी गृहमंत्र्यांची पोलिसांना क्लीन चिट

अखेर कारवाईचं आश्वासन

अखेर त्यावर “कार्यकर्ता कुणाचाही असो, त्याने चूक केली असेल तर त्याच्यावर आजच्या आज कारवाई केली जाईल आणि त्याला अटक केली जाईल”, असं आश्वासन अजित पवारांनी दिल्यानंतर विरोधकांचं समाधान झालं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget session devendra fadnavis aggressive after nana patole allegations pmw
First published on: 04-03-2021 at 13:18 IST