आजूबाजूच्या घटना, परिस्थितीवर बिनधास्त व्यक्त होण्याची विद्यार्थ्यांची धिटाई, सादरीकरणातील कल्पकता अशा पैलूंनी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या यंदाच्या पर्वाची महाअंतिम फेरी शनिवारी रंगली. आपापल्या विभागांतून अव्वल ठरलेल्या एकांकिकांना टक्कर देत मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयाची ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ ही महाराष्ट्राची लोकांकिका ठरली.

Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

महाराष्ट्रातील एकांकिकांची परंपरा सक्षमपणे पुढे नेणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या सहाव्या पर्वाची महाअंतिम फेरी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात जल्लोषात झाली. चित्रपट, नाटय़क्षेत्रातील मान्यवर, नाटय़रसिक, तरुणाईने एकांकिका पाहण्यासाठी गर्दी केली होती. ठाणे, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, मुंबई आणि पुणे अशा आठ विभागांमध्ये अव्वल ठरलेल्या एकांकिकांच्या एकाहून एक सरस सादरीकरणाने महाअंतिम फेरीच्या निकालाची उत्कंठा वाढवली. महाराष्ट्राची लोकांकिका म्हणून ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ या एकाकांकिकेचे नाव जाहीर झाले. त्यासरशी टाळ्या, हिप हिप हुर्रे.. अशा आरोळ्यांसह विजेत्यांनी जल्लोष केला. दिग्दर्शन, लेखन, अभिनय अशा वैयक्तिक परितोषिकांसह रामनारायण रुईया महाविद्यालयाने स्पर्धेत बाजी मारली.

औरंगाबादच्या सरस्वती भवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची ‘काळोखाचा रंग कोणता?’ ही एकांकिका द्वितीय पारितोषिकाची मानकरी ठरली. पुण्याच्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘टॅन्जेंट’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.

महाअंतिम फेरीचे परीक्षण ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, ज्येष्ठ नाटय़दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते अतुल परचुरे यांनी केले. स्पर्धकांनी आपल्या नाटय़ाविष्कारातून सामाजिक विषय मोठया खुबीने मांडले. स्पर्धकांच्या सादरीकरणातील प्रयोगशीलतेला प्रेक्षकांचीही उत्स्फूर्त दाद मिळाली. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी सॉफ्ट कॉर्नरचे दिलीप कुलकर्णी, बी. जी. चितळे डेअरीचे प्रमोद सरवणकर, झी टॉकीजचे बवेश जानवलेकर, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे प्रदीप काळे आदी उपस्थित होते. कुणाल रेगे यांच्या सूत्रसंचालनाने पारितोषिक वितरण समारंभाची रंगत वाढवली.

* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे विनय आपटे स्मृती पारितोषिक

– रणजीत पाटील, अजय कांबळे (बुद्रुकवाडीचा मारुती बाटला)

* सर्वोत्कृष्ट नेपथ्य – देवाशीष भरवडे, (बुद्रुकवाडीचा मारुती बाटला)

* सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – बाळू बटुके, चेतन ढवळे (काळोखाचा रंग कोणता)

* सर्वोत्कृष्ट लेखन – प्राजक्त देशमुख, (हमिनस्तु- कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, उरण)

* सर्वोत्कृष्ट अभिनय – वैभव काळे, (टॅन्जेंट), जगदीश कन्नम

(काळोखाचा रंग कोणता), कृष्णा डिक्कर (काळोखाचा रंग कोणता)

* सर्वोत्कृष्ट संगीत – (हमीनस्तु)

* परीक्षक शिफारस अभिनय प्रशस्तीपत्रक – गौरव सरफरे,(हमिनस्तु), स्नेहल गरदडे, (टॅन्जेंट), जयेश वाव्हळ, (बुद्रुकवाडीचा मारुती बाटला), रोहीत घांग्रेकर, (मुक्ताई).

परीक्षकांचा सल्ला

हे लोकांकिकेचे सहावे वर्ष आहे. आम्ही राज्य नाटय़ स्पर्धा करायचो तेव्हा असाच उत्साह दिसायचा. लोकांकिकाचा हा मंच म्हणजे चुका करण्याचा परवाना  आहे. व्यावसायिक नाटक करताना आपल्याकडे चुकण्याची मुभा नसते. त्यामुळे इथे बेधडक चुका करा. एखादी विशिष्ट गोष्ट केली की आम्हाला बक्षीस मिळेल अशी गणिते एकांकिकांमध्ये असू नयेत. प्रत्येकवेळी रंगमंचावरील गर्दीच यश मिळवून देते असे नाही. कधीकधी दोन माणसे शांतपणे बसून एकमेकांशी बोलत असतील तरीही विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. नाटक ही प्रयोगक्षम कला आहे. तो सुरुवातीला आणि अंतिमत: प्रयोगच असतो. नाटक हा साहित्यप्रकारसुद्धा आहे याकडे कृपया दुर्लक्ष करु नका.

– विजय केंकरे, ज्येष्ठ दिग्दर्शक

‘लोकसत्ता’चे हे व्यासपीठ अत्यंत महत्त्वपूर्ण असून ज्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनी पुढच्या वर्षी अधिक जोमाने नाटक करायला हवे.

-अतुल परचुरे,अभिनेते

या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळू शकते. मेहनत करण्याची तयारी ठेवली, तर पुढील काळ तुमचाच असेल.

– सुहास जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री

गेली काही वर्षे सॉफ्ट कॉर्नर या उपक्रमाचा भाग आहे. मी स्वत: नाटय़ स्पर्धामधून आलो असल्याने केवळ स्पॉन्सर म्हणून नाही तर या उपक्रमाची आवड म्हणून आम्ही लोकसत्तासोबत आहोत. महाराष्ट्रातील तरुणांसाठीचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे.

– दिलीप कुलकर्णी, सॉफ्ट कॉर्नर

लोकसत्ता आयोजित एकांकिका स्पर्धेत आजच्या तरुणांच्या समाजमनाचे प्रतिबिंब दिसून येते. लोकांकिका ही स्पर्धा दमदार आहे. आज ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा हे प्रमुख पाहुणे असल्याने त्यांचे विचार ऐकायला मिळणे ही एक कलाकारांसाठी भाग्याची गोष्ट आहे. मला यावर्षीच्या मुंबई विभागाच्या अंतिम फेरीचे परीक्षण करण्याची संधी मिळाली. स्पर्धेत तरुणांच्या मनाचा लसावि अनुभवयास मिळाला.

– ऋषीकेश जोशी, अभिनेता

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत पर्यावरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, लैंगिकता यासारख्या संवेदनशील विषयांवर एकांकिकेच्या माध्यमातून भाष्य केले. कोल्हापूरच्या भारती अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या शंकरराव पाटील यांच्या कथेवरील भोंडला या एकांकिकेत आजच्या काळानुसार योग्य ते बदल करणे अपेक्षित होते. आज महाअंतिम फेरीच्या सर्व एकांकिका पाहिल्या. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर उत्तम सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये विषयाची उत्तमरीत्या समज दिसून आली. अजून त्यांनी नाटकाच्या विविध अंगांवर काम करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या नाटय़कौशल्याला वाव देणारी लोकांकिका ही स्पर्धा दर्जेदार आहे

-नीरजा, कवयित्री

लोकांकिका गेली काही वर्षे सातत्याने पाहत आहे. यंदा या स्पर्धेच्या रत्नागिरी विभागीय अंतिम फेरीचे परीक्षणही केले. एकंदर स्पर्धा पाहताना असे जाणवते की, विद्यार्थी तांत्रिकदृष्टय़ा नवनवीन प्रयोग करत आहेत. पण लेखन अजून विकसित व्हायला हवे, विषयाचा सखोल विचार व्हायला हवा. केवळ प्रश्न मांडून चालणार नाही तर तरुणांनी त्यांच्या पद्धतीने त्याचे उत्तरही मांडायला हवे. आणि अशा स्पर्धामधून ते नक्की शिकतील अशी खात्री आहे.

– अजित भुरे, दिग्दर्शक

लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेमुळे खेडय़ा-पाडय़ांतील विद्यार्थ्यांना एक दर्जेदार व्यासपीठ मिळाले त्यासाठी या स्पर्धेचा कायमच हेवा वाटतो. या निमित्ताने ग्रामीण आणि शहरी जीवनाच्या व्यथा एकाच मंचावर पाहायला मिळतात. या व्यासपीठामुळे रंगभूमीला अनेक नवे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मिळतील अशी आशा आहे. विनय आपटे यांच्या स्मृती स्पर्धेच्या माध्यमातून आजही जोपासल्या जात आहेत. विनय आपटे पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला दिला जातो. त्याबद्दल मी ‘लोकसत्ता’ची आभारी आहे.

– वैजयंती आपटे, निर्मात्या

यावर्षीही बऱ्याच चांगल्या एकांकिका पाहायला मिळाल्या. दरवर्षी एकांकिकेचा दर्जा सुधारत आहे. ही तरुण मंडळी असे काही भन्नाट विषय घेऊन येतात, जे आपल्या मनातही येत नाहीत. आयरिस टॅलेंट हंटला यावर्षीही काही चांगले कलाकार सापडले. नवीन येणाऱ्या मालिकांमध्ये आम्ही त्यांना संधी देणार आहोत. त्यातून राज्याच्या विविध भागांतील तरुणांना वाव मिळेल.

– विद्याधर पाठारे,  आयरिस प्रॉडक्शन

झी टॉकीज ही वाहिनी नेहमीच उत्तमोत्तम चित्रपट आणि कार्यक्रम प्रेक्षकांना दाखवत असते. आजच्या तरुणांचे टॅलेंट आणि आवड लक्षात घेऊनच झी समूहाने ‘लोकसत्ता’शी संलग्न झाली. आपल्या प्रेक्षकांसाठी लोकांकिका ही एकांकिका स्पर्धा झी टॉकीज प्रक्षेपित करत आहे. आजचा तरुण वर्ग खूप प्रतिभाशाली आहे आणि त्याची प्रतिभा झी टॉकीजच्या माध्यमातून संपूर्ण जगात पसरावी आणि त्यातून उत्कृष्ट कलाकार, लेखक, दिग्दर्शक मराठी सृष्टीला मिळावेत अशी मी आशा करतो.

– बवेश जानवलेकर, झी टॉकीज

अशा स्पर्धाच्या माध्यमातून आम्ही ‘लोकसत्ता’शी जोडले जात आहोत याचा मला आनंद आहे. इथे येणाऱ्या मुलांचा उत्साह आणि कलाविष्कार पाहून थक्क व्हायला होते. अशा स्तुत्य उपक्रमांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कायम सहकार्य करत राहील.

– प्रदीप काळे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

इतर स्पर्धांप्रमाणे ही स्पर्धा कोणत्याही एका विभागाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर ती संबंध महाराष्ट्राला जोडून घेते. प्रत्येक केंद्रातून येणारा वेगळा विषय आणि सादरीकरणातील नाविन्य पाहून एकांकिका स्पर्धेमागील उद्देश सफल झाल्याचे वाटते. अशा स्पर्धेशी आपण जोडले गेलो आहोत, याचा आनंद आहे.

– रवी मिश्रा. अस्तित्व

हे नाटक आधी दोन अंकी होते. त्याचे एकांकिकेत रुपांतर केल्याने प्रकाश योजनेतही बरेच बदल करावे लागले. त्यासाठी आमच्या चमूने वेगवेगळे प्रयोग केले. त्याचे फळ आज मिळाले.

– चेतन ढवळे, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना.

खेडय़ातील गृहिणीचा अभिनय करताना थोडे अवघडल्यासारखे वाटत होते. आमच्या दिग्दर्शकाने आणि कलाकारांनी माझा अभिनय चांगला व्हावा यासाठी भरपूर मेहनत घेतली.

– मृणाल तारे, टॅन्जेंट एकांकिकेतील कलाकार.

आमच्या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मला भरून आले. हमिनस्तू नाटकात अभिनय करताना खूप मजा आली.- गौरव सरफरे, उत्कृष्ट अभिनय, हमिनस्तू

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत आम्ही पहिल्यांदाच सहभागी झालो आणि त्यात पारितोषिकही मिळाले याचा आनंद आहे.

– वैभव काळे, टॅन्जेंट या एकांकिकेतील कलाकार.

एवढा मोठा मंच आणि पारितोषिक देणारे मान्यवर पाहून भारावून गेले.

– स्नेहल गरदडे, अभिनय प्रशस्तीपत्रक

माझ्यासाठी याहून आनंदाचा दिवस नाही. पण एवढय़ात थांबून चालणार नाही. भविष्यात मी स्वत:ला अभिनयदृष्टय़ा आणखी परिपक्व करण्याचा प्रयत्न करीन.

– रोहित घांग्रेकर, अभिनय प्रशस्तीपत्रक

माझे हे पहिलेच नाटक आणि पहिल्याच नाटकात पारितोषिक मिळाल्यामुळे भारावून गेलो आहे.

– जगदीश कन्नम, सर्वोत्कृष्ट अभिनय

पुढल्या वर्षी पुन्हा स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक मिळवून ‘हॅट्रिक’ करण्याचा  मानस आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे आयोजन उत्तम असल्यामुळे ही एकांकिका स्पर्धा राज्यात प्रथितयश ठरत आहे.

– देवाशिष भरवडे, सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार

‘काळोखाचा रंग कोणता’ या एकांकिकेत मी माकडाची भूमिका साकारली. त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि आज त्या मेहनतीला फळ मिळाले.

– कृष्णा डिक्कर, सर्वोत्कृष्ट अभिनय

‘लोकसत्ता लोकांकिके’त मी पहिल्यांदाच सहभागी झालो. राज्यातील ही एक मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेत परीक्षक पसंतीचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला, याचा अभिमान आहे. मात्र त्यासोबतच पुढील काळात माझ्यातल्या कलेला प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार आहे, असे मी समजतो.

– जयेश वाव्हळ, अभिनय प्रशस्तीपत्रक

गेल्यावर्षी अंतिम फेरी गाठण्यात आम्हाला अपयश आले होते. यंदा मात्र अंतिम फेरीत दाखल होऊन एकांकिकेच्या प्रथम क्रमांकासह उत्कृष्ट दिग्दर्शनाचेही पारितोषिक मिळाले. त्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे.

– रणजित पाटील, अजय कांबळे (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक)

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडत आहे. ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या स्पर्धेसाठी प्रक्षेपण भागीदारदेखील आहे. तर ‘एबीपी माझा’ न्यूज पार्टनर आहे. लोकांकिकाच्या मंचावरील कलाकारांना चित्रपट-मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.