मुंबई : अभिनेते दिलीपकुमार आणि सायरा बानो यांच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्य़ात अटकपूर्व जामीन मिळविण्यात यश मिळविलेले बिल्डर समीर भोजवानी यांना खटाव कुटुंबीयांच्या ट्रस्टच्या मालकीच्या पाली हिल आणि अक्सा बीच येथील मालमत्तेची बनावट कागदपत्रे बनविल्याच्या आरोपावरून आर्थिक गुन्हे विभागाने गुरुवारी अटक केली.

दिलीपकुमार राहात असलेला बंगला आपल्या मालकीचा असल्याचा दावा करीत भोजवानी यांनी तो रिक्त करण्यासाठी दबाव आणला होता. हा बंगलाही मूळ खटाव ट्रस्टशी संबंधित होता. परंतु याप्रकरणी आपल्याकडे नोंदणीकृत कागदपत्रे असल्याचा दावा भोजवानी यांनी केला होता. याप्रकरणी दिलीपकुमार आणि सायरा बानो यांनी  तक्रार दाखल केली होती.

ट्रस्टच्या पाली हिल येथील तीन व अक्सा बीच येथील दोन मालमत्ता अशाच पद्धतीने बळकाविण्याचा प्रयत्न केला जात असल्याप्रकरणी पन्ना खटाव आणि दिव्याकांत खटाव यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल करून भोजवानी यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली. पाली हिल येथील तीन तर अक्सा बीच येथील दोन मालमत्ता भोजवानी यांनी बनावट कागदपत्रे तयार करून ती नोंदणीकृत करून बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. भोजवानी यांनी खटाव कुटुंबीयातील दिलीप, महेंद्र तसेच हितेन खटाव यांच्या संगनमताने ही फसवणूक केल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला होता. भोजवानी यांच्यासह अन्य तिघांकडून तपासकार्यात सहकार्य मिळत नसल्याच्या कारणावरून भोजवानी यांना अटक करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे विभागाने स्पष्ट केले आहे.

खटाव कुटुंबीयांच्या मालकीची मुलराज खटाव ट्रस्ट असून पाली हिल आणि अक्सा बीच येथील मालमत्ता या ट्रस्टच्या अंतर्गत होत्या. परंतु दिलीप, महेंद्र आणि हितेश खटाव यांच्याशी संगनमत करून भोजवानी यांनी या मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. यापैकी काही प्रकरणांत भोजवानी यांनी ट्रस्टीच्या सह्य़ा नसताना वा कुठल्याही स्वरूपाचे मुखत्यारपत्र नसतानाही मालमत्तेबाबतची कागदपत्रे उपनिबंधक कार्यालयात नोंदणीकृत केली होती. ही नोंदणीकृत केलेली कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याचेही नंतर उपनिबंधकांनी स्पष्ट केले होते.  दिलीपकुमार यांच्या बंगल्याचा ताबा मिळविण्यासाठीही त्यांनी अशाच बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता, असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले. भोजवानी यांनी मात्र ते अमान्य केले आहे.