मुंबई महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या इमारत बांधकामविषयक सर्व परवानग्या व कार्यपद्धती सुटसुटीत करण्यात आली असून परवानग्यांची संख्या ११९ वरून ५८ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
किनारपट्टी रस्ता (कोस्टल रोड) २०१९ पर्यंत बांधून पूर्ण करण्यात आणि शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पाच्या निविदा लवकरच मागविल्या जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘ईझ ऑफ डुइंग बिझिनेस’ अंतर्गत मुंबई महापालिकेने इमारत बांधकाम परवानग्यांसाठी सुधारित कार्यपद्धती सुरू केली आहे. यासंदर्भातील माहितीपुस्तिकेचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते सह्य़ाद्री अतिथिगृहात नुकतेच झाले.
नवीन कार्यपद्धतीत माहिती तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यात आल्याने परवानग्यांचा कालावधी ६० दिवसांवर येईल. त्यामुळे घरांच्या किमतीही काही प्रमाणात कमी होऊन सर्वसामान्यांना लाभ होईल. सर्व परवानग्या वेळेत मिळाल्या, तर परवडणारी घरे वेळेत उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सर्व महापालिका व नगरपालिकांनी मुंबई महापालिकेची कार्यपद्धती अमलात आणावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुंबईत फेब्रुवारीत कार्यशाळा
मेक इन महाराष्ट्र आणि मेक इन इंडियासाठी १४ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जागतिक स्तरावर मुंबईत एका कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व्यक्ती त्यात सहभागी होणार असून त्यामुळे राज्यात मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.