घोडबंदर मार्गावरील रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या चार मजली इमारतीवर मंगळवारी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. या निवासी इमारतीमध्ये वास्तव्य करत असलेल्या २१ कुटुंबांचे साकेत येथील रुस्तमजी गृहसंकुलात बेघरांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. कडक पोलीस बंदोबस्तात हाती घेण्यात आलेल्या या कारवाईस काही राजकीय पुढाऱ्यांचा विरोध असल्याची चर्चा होती.
ठाणे महापालिकेने गोल्डन डाईज ते पातलीपाडादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील सव्‍‌र्हिस रोडचे काम प्राथमिक टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. कापूरबावडी येथे उभारण्यात आलेल्या स्वीट होम या निवासी इमारतीमुळे या रुंदीकरणाच्या कामात अडथळे निर्माण होत होते. काही ठिकाणी तर हा रस्ता पूर्ण होणार नाही अशी परिस्थिती होती. त्यामुळे महापालिकेने या इमारतीमधील २१ कुटुंबांना घरे रिकमी करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून मोठा फौजफाटा घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही इमारत पाडण्याचे काम सुरू केले. ही कारवाई करण्यापूर्वी २१ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले होते. दरम्यान, या कारवाईमुळे घोडबंदर मार्गाच्या रुंदीकरणातील मोठा अडथळा दूर झाला आहे. या मार्गाच्या रुंदीकरणादरम्यान बाधित झालेल्या कुटुंबांचे आधी पुनर्वसन करायचे, नंतर कारवाईचे हत्यार उपसायचे, असे धोरण महापालिकेने आखले आहे. या धोरणानुसार स्वीट होम इमारतीतील २१ कुटुंबांचे आधी पुनर्वसन करण्यात आले, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.