दुर्घटना घडल्यास जबाबदारी कंत्राटदारांची

देशातील सर्वात आव्हानात्मक मानला जाणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या भुयारी मार्गासाठी बोगदा तयार करण्याचे काम येत्या महिन्यात सुरू होणार आहे. या कामादरम्यान आसपासच्या परिसरातील जुन्या इमारतींना धोका पाहचू नये यासाठी सर्व ती खबरदारी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने (एमएमआरसीएल) घेतली आहे. मात्र कामादरम्यान इमारतींना कंपने जाणवू शकतात व ते प्रमाणाच्या बाहेर असेल तर इमारतींना धोका पोहचण्याची शक्यताही कंपनीने व्यक्त केली आहे. असा धोका निर्माण होऊन कोणताही घातपात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्या भागात काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीची राहील असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील भुयारी मेट्रो-३ या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामचा पुढचा टप्पा म्हणून ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बोगदा तयार करणारी ‘टीबीएम’यंत्रे शहरात दाखल होणार आहेत. या यंत्राने बोगदा तयार करण्याचे प्रत्यक्ष काम सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. हे काम सुरू असताना साधारणत: एक आठवडा हे यंत्र एका भागात काम करणार आहे. या कालावधीत आसपासच्या परिसरातील इमारतींना कंपने जाणवण्याची शक्यता आहे. याची पूर्वकल्पना असल्यामुळे मेट्रोच्या मार्गातील सर्व इमारतींचे परीक्षण करण्यात आले असून त्यातील अहवालानुसार ज्या इमारतींचे बांधकाम कमकुवत झाले असेल त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. ही काळजी घेऊन ज्यावेळेस प्रत्यक्ष काम सुरू होईल त्यावेळेस काम सुरू असलेल्या परिसरातील इमारतींना कंपने जाणवू शकतात.

या कंपनांमुळे इमारतींना काही धोका निर्माण होतो आहे का, याचा त्यावेळेस अभ्यास केला जाणार आहे. जर गरज भासल्यास इमारत रिकामी केली जाणार असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले जाईल अशी माहिती एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. याची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदार कंपनीवर राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. जर या कामादरम्यान इमारत कोसळली तर काय,  असा प्रश्न विचारला असता आम्ही योग्य ती खबरदारी घेतली असून असा प्रसंग उद्भवणारच नाही. त्यातूनही जर अशी परिस्थिती निर्माण झालीच तर त्याची जबाबदारीही कंत्राटदाराची राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

कंपने जाणवण्याची शक्यता कमीच

बोगदा तयार करण्याचे हे काम भूगर्भात २० मीटर खोलवर सुरू असणार आहे. त्यावर बेसाल्ट खडक आहे. यामुळे इमारतींना जाणवणाऱ्या कंपनांची तीव्रता कमी होणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले.